ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अशोक सराफ यांच्या नावाची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुण्यात केली. सांस्कृतिक मंत्र्यांच्या घोषणेनंतर अशोक सराफांनी प्रेक्षकांचे आभार मानले.
“रडण्याचा अभिनय करून लोकांना रडवणं हे कठीण काम आहे, त्याचप्रमाणे हसवण्याचा अभिनय करून समोरच्याला हसवणं हे महाकठीण काम आहे. हे महाकठीण काम अशोक सराफ यांनी अनेक वर्षे केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. दरम्यान, पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नावं सुचवायची असतात, त्याचा मी अध्यक्ष आहे. मी विचार करत होतो की कोणती कोणती कशी नावं सुचवायची. इथं आल्यावर माझा निर्णय पक्का झाला की महाराष्ट्र सरकारच्या वतीने पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांचं नाव निश्चितपणे पाठवलं पाहिजे आणि ते आम्ही पाठवणार,” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
“मी सिगारेट ओढत होतो अन्…”, सुबोध भावेने मंजिरीला रक्ताने लिहिलेलं पत्र; खुलासा करत म्हणाला…
या घोषणेनंतर अशोक सराफ यांनी मनोगत व्यक्त केलं. “मी माझं कर्तव्य समजतो की मी इथे एकटा उभा नाही. कुठल्याही गोष्टीला पाठून टेकू लावतात ना त्याप्रमाणे तुम्ही सगळे माझ्या पाठिशी उभे आहात. आजचा सत्कार मी कधीही विसरू शकत नाही. कलेच्या क्षेत्रात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असताना कलाकाराला प्रेक्षकांकडून मिळणारे पाठबळ फार महत्वाचे असतात, त्याशिवाय कलाकाराचे प्रयत्न व्यर्थ आहेत. मला कायमच असे पाठबळ महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी दिले,” असं अशोक सराफ म्हणाले.