अभिनेत्री सुकन्या मोने आणि अभिनेता संजय मोने मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर दोघांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपटांतून सुकन्या आणि संजय यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात.
हेही वाचा- “समारंभपूर्वक लग्न करणं हा माझ्या मते गुन्हा”; संजय मोने यांचं वक्तव्य, म्हणाले…
नुकतंच संजय आणि सुकन्या मोने ‘लोकमत फिल्मी’च्या ‘लव्ह गेम लोचा’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या मुलाखतीत दोघांनी करिअरबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, या मुलाखतीत सुकन्या मोने यांनी संजय मोनेंनी त्यांना कसं प्रपोज केलं याबाबतचा किस्सा सांगितला आहे.
सुकन्या म्हणाल्या, “एके दिवशी आमचा मॅनेजर आणि मित्र प्रताप सावंत रात्री २ वाजता माझ्या घरी आला. नाटकातल्या लोकांना माहिती असेल प्रताप सावंत कोण आणि कसा होता. तो अचानक रात्री २ वाजता माझ्या घरी आला आणि मला म्हणाला, सुकन्या तुम्ही दोघं लग्न करत आहात? मी म्हणाले, कोण? तर तो म्हणाला, तू आणि संजय. मी म्हणाले, कुणी सांगितलं? तर तो म्हणाला, त्यानेच सांगितलं. आत्ता संजय टॅक्सीत आहे खाली. त्यावेळी खूप जोराचा पाऊस पडत होता. मी खाली गेले आणि म्हणाले, काय मोने तुम्हाला लग्न करायचंय माझ्याशी? तर संजय म्हणाले, तुम्हाला नाही करायचं का? इथेच मी समजून गेले.”
सुकन्या यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. ‘बाईपण भारी देवा’नंतर सुकन्या यांचा ‘इंद्रधनुष्य’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुकन्या यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, सागर कारंडे, प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील यांची प्रमुख भूमिका आहे.