‘बाईपण भारी देवा’मध्ये साधना काकडेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुकन्या मोने यांच्या भूमिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतींमध्ये सुकन्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व चित्रपटांबद्दल माहिती देत आहेत. सुकन्या व त्यांचे पती संजय मोने यांना एकच मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव ज्युलिया आहे. तिचं नाव ज्युलिया ठेवण्यामागचं कारण सुकन्या यांनी सांगितलं आहे.
“मूल होऊ देऊ नकोस नाहीतर…” सुकन्या मोनेंना डॉक्टरांनी दिलेला सल्ला, पण…
सुकन्या मोने म्हणाल्या, “आमचा एक ग्रूप आहे, त्या ग्रूपमधील कुणालाही मूल झालं की मित्र राजीव नाईक बाळाचं नाव ठेवायचा. पण मी संजयला म्हणाले की राजीव प्रचंड हुशार आहे, मात्र आपल्या बाळाचं नाव तूच ठेवायचं. संजय म्हणाला ‘ठिक आहे, मी माती किंवा दगड नाव ठेवेन. मुलगी झाली तर माती व मुलगा झाला तर दगड’. त्याच्या मित्राला मी बोलले म्हणून त्याला राग आला आणि तो असं बोलला. मी म्हटलं ‘दगड संजय मोने’, ‘माती संजय मोने’ असं लागणार आहे. आपल्याकडे आईचं नाव लावायची पद्धत नाही. त्यावर तो एलेक्झांडर नाही तर एलिझाबेथ ठेवेन असं म्हणाला. त्यावर बाळाला तू ‘अलक्या’ अशी हाक मारणार का असं उत्तर मी दिलं. त्याने ‘मला हवं ते नाव ठेवेन’ असं उत्तर दिलं आणि मीही हो म्हणाले. पण नाव संजयनेच ठेवावे असा माझा हट्ट होता.”
“बाळ पोटात असताना मी संजयला बाळाशी बोल असं म्हणायचे, पण त्याला ते पटायचं नाही. पण जेव्हा ज्युलिया जन्माला आली आणि त्याने तिला बघून हाक मारली, त्यावर तिने जो लूक दिला, त्यावरून हा तिच्या ओळखीचा आहे असं मला जाणवलं. ती संजयकडे ज्याप्रकारे बघून हसली, ते बघून तो म्हणाला, ‘ही काय हसते यार, ज्युलिया रॉबर्ट्सची आठवण झाली’. ज्युलियाचं हास्य बघून आम्हाला प्रसन्न वाटतं म्हणून आम्ही आमच्या मुलीचं नाव ज्युलिया ठेवलं,” असं सुकन्या मोने म्हणाल्या.
दरम्यान, लग्नानंतर अपघातामुळे सुकन्या अंथरुणाला खिळल्या होत्या. डॉक्टरांनी सुकन्या मोनेंना मूल होऊ न देण्याचा सल्ला दिला होता. सुकन्या मोने आपल्या निर्णयावर ठाम होत्या. पती आणि त्यांच्या सासूबाईंनी सुद्धा त्यांच्या या निर्णयाला विरोध केला. मात्र, सुकन्या हट्टाला पेटल्या होत्या आणि मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्युलियाचा जन्म झाला होता.