अभिनेत्री सुकन्या मोने या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं त्या विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. तर सध्या त्या त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. अशातच एका वेगळ्या कारणाने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं आहे.
सुकन्या मोने यांनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. गेले अनेक दिवस त्या या चित्रपटाचं प्रमोशन करत होत्या. आतापर्यंत या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी अनेक मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतींमधून त्यांनी त्यांच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. त्यांच्या कामाबरोबरच त्या सामाजिक कार्यातही तितक्याच सक्रिय असतात. त्या दरवर्षी एका मुलाला दत्तक घेतात असा खुलासा करत त्यांनी त्या मागचं कारण सांगितलं आहे.
हेही वाचा : दोन दिवसांत पिंपल घालवायचेत? सुकन्या मोनेंनी सांगितला सोपा घरगुती उपाय, म्हणाल्या…
त्या म्हणाल्या, “आम्हा भावंडांना आमच्या आई-वडिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. आपल्याला मिळणारे पैसे कुठे गुंतवायचे किंवा कसे ते खर्च करायचे हे मी त्यांच्याकडे पाहून शिकले. काही रक्कम मी देवधर्मासाठी देते, तर काही एखाद्या संस्थेसाठी देते. मी दरवर्षी ठरवते की या या संस्थांना हे हे द्यायचं आहे आणि अशाप्रकारे मी अनेक संस्थांशी निगडित आहे. अशा अनेक एनजीओ आहेत ज्यांचं काम अजून लोकांपर्यंत फारसं आलं नाही किंवा ज्यांच्याकडे फारशी मदत जात नाही अशा एनजीओंना मी माझ्यातला काही भाग सहाय्य म्हणून देते.”
पुढे त्या म्हणाल्या, “बाहेरगावचे जे आश्रम आहेत त्यातील दरवर्षी मी एकेका मुलाला दत्तक घेते आणि त्याचा एका वर्षाचा सगळा खर्च उचलते. हे मला माझ्या आईकडून मिळालं आहे. कारण ती हे सगळं करत असते. आपण आपल्यावर जे पैसे खर्च करतो ते न करता जर आपण हे केलं तर आपल्याबरोबर दुसऱ्यालाही याचा आनंद मिळेल अशी एक भावना सतत माझ्या मनात असते.”