सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सोनाली पंडित, ऋजुता देशमुख आणि पूर्वा गोखले यांच्या प्रमुख भूमिका असणारे ‘सेल्फी’ नाटक मराठी कलाविश्लात प्रचंड गाजले. प्रेक्षकांनी सुद्धा या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, हे नाटक कोणासाठी लिहिले? यामागील मुख्य उद्देश काय होता? याचे कारण खूपच खास आहे. या नाटकाबाबत नुकत्याच ‘लेट्सअप मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री सुकन्या मोने यांनी खुलासा केला आहे.
सुकन्या मोने ‘सेल्फी’ नाटकाविषयी सांगताना म्हणाल्या, “या चित्रपटसृष्टीत माझ्या काही अत्यंत जवळच्या मैत्रिणी आहेत. आजची तरुणपिढी मोठ्या उत्साहाने मैत्री दिवस साजरा करते. अगदी त्याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी आमच्या लाडक्या शिल्पा नवलकरने आम्हा सगळ्या मैत्रिणींना एक छान गिफ्ट दिले होते. अर्थात ते गिफ्ट आमच्यासाठी सगळ्यात खास आहे. कारण, शिल्पाने मैत्री दिवसाची भेट म्हणून आमच्यासाठी एक नाटक लिहिले होते.”
हेही वाचा : “आज बिल्डिंगमध्ये फरसाण वाटते…”, सई ताम्हणकरने वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीला दिल्या हटके शुभेच्छा
सुकन्या मोने पुढे म्हणाल्या, “शिल्पाने लिहिलेलं नाटक म्हणजे ‘सेल्फी’. नाटक लिहिण्याची अशी आगळीवेगळी कल्पना आजकाल कोणाच्याही डोक्यात येणार नाही. या ‘सेल्फी’ नाटकात आम्ही सगळ्या मैत्रिणींना काम केले. यामध्ये आम्हा सगळ्या मैत्रिणींना भूमिका साकारायला मिळतील हे डोक्यात ठेऊनच तिने हे सुरेख नाटक लिहिले होते. या नाटकाचे आम्ही अनेक दौरे केले होते.”
दरम्यान, रंगभूमीवर गाजलेल्या ‘सेल्फी’ नाटकात सुकन्या कुलकर्णी (स्वाती कवठेकर), शिल्पा नवलकर (तनुजा), सोनाली पंडित (प्रा. विभावरी), पूर्वा गोखले (शाल्मली) आणि ऋजुता देशमुख (मीनाक्षी) या पाच अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुकन्या मोने आणि शिल्पा नवलकर यांनी एकत्र काम केले आहे.