ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं आज वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं आहे. वृध्दापकाळाने त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली. सुलोचना यांच्या निधनामुळे संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात सुलोचना यांनी श्रोत्यांना आपलसं केलं.
आजही सुलोचना चव्हाण यांची लोकप्रियता कायम आहे. मराठीमधील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सुलोचना यांच्या निधनानंतर भावूक झाले आहेत. सुलोचना चव्हाण यांच्या सारखी लावणी आजवर कोणी गायली नाही अशा शब्दांमध्ये अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीशी संवाद साधताना अशोक सराफ म्हणाले, “तडफदार आवाज, लावणी म्हणण्याची एक वेगळीच शैली सुलोचना चव्हाण यांची होती. यापूर्वी कधीच तडफदार आवाजामध्ये लावणी कोणी गायली नव्हती. मराठी चित्रपटसृष्टी व मराठी नाट्यसृष्टी, संगीतक्षेत्राचं सुलोचना चव्हाण यांच्या जाण्याने मोठं नुकसान झालं आहे.”
आणखी वाचा – ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांचं निधन
“कारण सुलोचना चव्हाण यांच्यासारखा आवाज पुन्हा होणे नाही. ज्यापद्धतीने त्यांनी आपला आवाज लोकांच्या मनामध्ये रुजवला तसं कोणाला शक्य होईल असं मला तरी वाटत नाही. सुलोचना चव्हाण यांची गाणी, त्यांचा सूर, स्वर आणि गाण्याची स्टाइल याच माझ्यासाठी त्यांच्याबद्दलच्या मोठ्या आठवणी आहेत.”