९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते सुनील बर्वे अजूनही मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही क्षेत्रांत सक्रिय आहेत. पन्नाशी उलटूनही त्याच उत्साहात ते काम करताना दिसत आहेत. अलीकडेच त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ लोकप्रिय मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता सुनील बर्वे नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
सुप्रसिद्ध संगीतकार व गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाची २५ जुलैला त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून घोषणा करण्यात आली होती. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ असं या चित्रपटाचं नाव आहे. याच चित्रपटातून पुन्हा एकदा सुनील बर्वे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात सुनील बर्वे मुख्य भूमिकेत म्हणजेच सुधीर फडके यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
हेही वाचा – “… तर ‘मुळशी पॅटर्न’ १०० कोटी क्रॉस केलेला चित्रपट असता”; दिग्दर्शक प्रवीण तरडे खंत व्यक्त करीत म्हणाले…
याविषयी नुकतीच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये सुनील बर्वे यांनी लिहिलं आहे, “बाबूजी, तुमच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून आजपासून तुमचं चरित्र साकारण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे. तुमच्या वागण्या-बोलण्यातलं मार्दव, ध्येयाप्रतिची निष्ठा, संगीत क्षेत्रातील उत्तुंग कर्तृत्व, आवाजातील गोडवा, सच्चा व शुद्ध सूर आणि बरंच … यातलं ०.००१% जरी मला साकारता आलं तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. तुमचे आशीर्वाद पाठीशी असू द्या आणि जगभरातील तुमच्या चाहत्यांच्या शुभेच्छाही. विनम्र, सुनील बर्वे.”
हेही वाचा – स्पृहा जोशीच्या बहिणीनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलंय नाव; अभिनेत्री म्हणाली, “जागतिक पातळीवर…”
हेही वाचा – भारतीय जवान आहे किरण मानेंचा जबरा फॅन; अभिनेते अनुभव सांगत म्हणाले, “काळीज…”
दरम्यान, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात सुनील बर्वे यांच्याव्यतिरिक्त सागर तळाशीकर (ग. दि. माडगूळकर), मिलिंद फाटक (राजा परांजपे), सुखदा खांडकेकर (माणिक वर्मा), धीरेश जोशी (वीर सावरकर), शरद पोंक्षे (डॉ. हेडगेवार) ही कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिका़त दिसणार आहेत. योगेश देशपांडे या चित्रपटाच्या लेखन व दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.