अभिनेता सुनील बर्वे यांनी नाटक, मालिका, सिनेमा अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मराठीसह हिंदी, गुजराती भाषिक मालिकेतही त्यांनी काम केलं. सध्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ते व्यस्त आहेत. यादरम्यान त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. अशाच एका मुलाखतीत सचिन पिळगावकर आणि वंदना गुप्ते यांनी त्यांच्या कामाचं कशाप्रकारे कौतुक केलं याचा किस्सा सांगितला आहे.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, अशी कोण व्यक्ती आहे, जिने भरभरून तुमच्या कामाचं कौतुक केलंय. यावर सुनील बर्वे म्हणाले, “वंदना गुप्तेने माझं खूप कौतुक केलंय. तिला माझ्या कामाबद्दल खूप कौतुक होतं. मी गाडी घेतली होती तेव्हा तिने मला एक पत्र दिलं होतं, ज्याच्यामध्ये तिने लिहिलं होतं की पहिलं नाटक, पहिला सिनेमा त्या सगळ्या पहिल्यामध्ये मी तुझ्याबरोबर होते; त्यामुळे पहिल्या गाडीतलं पहिल डिझेलसुद्धा माझ्याकडून. असं म्हणून तिने मला एक पाकीट दिलं होतं आणि पहिलं डिझेल माझ्या गाडीत तिने भरलं होतं. ही पावती कशाची होती, तर मी तिच्याबरोबर जे काम केलं त्याची पोचपावती होती ती आणि त्याचं कौतुक होतं तिला.”
“तसंच सचिन पिळगावकरांनीसुद्धा माझं अनेकदा कौतुक केलंय. ‘अशी ही आशिकी’ नावाचा आम्ही एक चित्रपट केला होता. तेव्हा चित्रपटातला एक सीन संपल्यानंतर त्यांनी मला अशीच एक नोट दिली होती.”
“कुंकू मालिकेतल्या एका सीनसाठी त्यांनी पार्टीमध्ये माझं कौतुक केलं होतं. ते म्हणाले की, त्या सीनमध्ये तू काहीही करत नव्हतास, तू फक्त मागे उभा होतास, पण ज्या पद्धतीने तू मृण्मयीकडे बघत होतास ना त्याच्यावर मी फिदा झालो आणि मी खूश झालो.”
हेही वाचा… “अभ्यास सो़डून हे काय…”, भाऊ कदमांनी लेक मृण्मयीच्या ‘त्या’ निर्णायाला केला होता विरोध
“एकदा सचिन पिळगांवकर हर्बेरियमच्या उपक्रमासाठी ‘झोपी गेलेला जागा झाला’साठी आले होते आणि पहिल्या रांगेत ते बसले होते. मी शेवटी येऊन कर्टन कॉल घेत होतो तेव्हा ते उठून सगळ्या प्रेक्षकांसमोर ओरडून म्हणाले होते, काय काम करतोयस तू सुनील, क्या बात है. इतकं तोंडभरून कौतुक करणारी माणसंपण खूप कमी असतात. ही मंडळी प्रोत्साहन देणारी आहेत, तेव्हा आपल्यालाही असं वाटत की आपण जे करतोय ते योग्य दिशेने करतोय, अगदी बरोबर करतोय.”
दरम्यान, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची निर्मिती सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे यांनी केली आहे. सुनील बर्वे यांच्यासह मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.