अभिनेता शुभंकर तावडे ‘फ्रेशर्स’ मालिकेतून लोकप्रिय झाला. पुढे ‘कागर’, ‘वेड’ अशा चित्रपटांत तो झळकला. नुकताच तो ‘कन्नी’ चित्रपटाच्या प्रीमियरला दिसला होता. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शुभंकरने एका मुलाखतीत नेपोटिझमबद्दल भाष्य केले आहे. त्याची ही मुलाखत सध्या चर्चेत आहे.
अलीकडेच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत, शुभंकर तावडे हा ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा असल्याने स्टार किड्सबाबत जी बॉलीवूडमध्ये संकल्पना आहे तशी मराठीत आहे का, असा प्रश्न शुभंकरला विचारण्यात आला. त्यावर आपले मत मांडत शुभंकर म्हणाला, “मला नाही वाटत असं. कारण- माझ्या वडिलांनासुद्धा आता कामासाठी फोन करावे लागतात.”
पुढे शुभंकर म्हणाला, “ही कॉमेडी गोष्ट आहे. कारण- इतर लोकांनाच फक्त वाटत असतं की नेपोटिझम आणि या सगळ्या गोष्टी फक्त या इंडस्ट्रीत घडतात. आता ऋता माझी मैत्रीण आहे आणि जर मी उद्या निर्माता झालो, तर ऋताच्या मुलीला किंवा मुलाला संधी द्यायला काय हरकत आहे. ही इंडस्ट्री कुठे तरी एक्सपोजरमध्ये आहे म्हणून हे दिसतं. प्रत्येक पॉलिटिकल फॅमिली असू दे किंवा डॉक्टर असू दे किंवा किराणा मालाचं दुकान असू दे हे सगळे आपल्या पुढच्या पिढीलाही त्याच गोष्टी करायला लावतात. फक्त क्रिकेट, स्पोर्ट्स किंवा मनोरंजनसृष्टी लोकांच्या खूप समोर आहे म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टी दिसून येतात.”
“पण मला नाही वाटत की, मराठीत नेपोटिझम आणि या सगळ्या गोष्टी आहेत आणि जरी असल्या तरी त्या चुकीच्या नाहीत. कारण- लोक ठरवतात कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं. मोठमोठे लोक चांगलं काम करतात आणि या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहतात. पण, चांगला लाँच देऊनही ज्यानं चांगलं काम नाही केलं, ती माणसं जास्त काळ टिकून राहत नाहीत,” असंही शुभंकरनं नमूद केलं.
हेही वाचा… नववधू पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण निघाले हनिमूनला, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, शुभंकरच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ऋता दुर्गुळे अभिनित ‘कन्नी’ या चित्रपटात शुभंकरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजिंक्य राऊत, वल्लरी विराज, रिशी मनोहर यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.