Suraj Chavan & Jahnavi Killekar : सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक’ सिनेमा येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने सध्या ‘गुलीगत किंग’ या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सूरजने त्याचा पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी ‘बिग बॉस मराठी’च्या सर्व सहस्पर्धकांची भेट घेतली आहे. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण या सगळ्यांच्या घरी जाऊन सूरजने त्याच्या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आशीर्वाद घेतले.

आता सूरजचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सूरज या गाण्यात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरसह डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमातील “वाजीव दादा…” हे गाणं अलीकडेच प्रदर्शित करण्यात आलं.

‘वाजीव दादा’ हे गाणं सूरज चव्हाणसह जुई भागवत, हेमंत फरांदे आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामधील काही कलाकारांवर म्हणजेच जान्हवी किल्लेकर, छोटा पुढारी, वैभव चव्हाण, इरिना आणि पुरुषोत्तम पाटील यांच्यावर चित्रित केलं गेलं आहे. या गाण्यात ऑनस्क्रीन जान्हवी व सूरजने जबरदस्त डान्स केला आहे. अगदी त्याचप्रमाणे, या दोघांनी चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ऑफस्क्रीन एकत्र येऊन तसाच भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.

‘वाजीव दादा’ या गाण्यातील हूकस्टेपप्रमाणे रुमाल धरून जान्हवी आणि सूरज या गाण्यावर थिरकले आहेत. सूरज सांगतो, “माझी लाडकी मैत्रीण व ताई जान्हवी हिच्याबरोबर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘कोंबडी पळाली’गाण्यावर लय जब्बर नाचलो होतो आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला तेव्हा जसं प्रेम दिलंत, तसंच प्रेम आमच्या ‘वाजीव दादा’ गाण्याला द्या. या हळदीच्या गाण्यावर आज एकत्र नाचून लई जब्बर मज्जा आली…!”

सूरज आणि जान्हवीच्या जबरदस्त एनर्जीने केलेला डान्स पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “क्या बात है”, “सूरज भाऊ म्हणजे टॉपचा विषय”, “अरे वाजीव दादा”, “आपल्या गुलिगत भावाला गुलिगत सपोर्ट करा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. दरम्यान, हा ‘झापुक झुपूक’ सिनेमा येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.