Varsha Usgaonker & Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. शोच्या महाअंतिम सोहळ्यात सूरजबरोबर चित्रपट करणार असल्याचं केदार शिंदेंनी जाहीर केलं होतं. चाहत्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सूरज मुख्य भूमिकेत असलेला सिनेमा येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘गुलीगत किंग’ला पाठिंबा देण्यासाठी सध्या इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी पुढे आले आहेत. याशिवाय सूरजचे ‘बिग बॉस’च्या घरचे सहस्पर्धक सुद्धा त्याला या नव्या सिनेमासाठी आवर्जून पाठिंबा देत आहे.
महाराष्ट्राच्या एव्हरग्रीन अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’च्या घरातील सूरज चव्हाणच्या आई वर्षा उसगांवकर सूरजला पाठिंबा देत सांगतात, “नमस्कार मी वर्षा उसगांवकर आणि माझ्याबरोबर आहे माझा ‘बिग बॉस मराठी’चा साथीदार आणि या शोचा विजेता सूरज चव्हाण. तर, सूरजचा आता नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केदार शिंदेंनी दिग्दर्शित केलेल्या ‘झापुक झुपूक’ सिनेमात सूरज चव्हाण प्रमुख भूमिका साकारत आहे. हा सिनेमा तुम्ही जरूर पाहा कारण, आपल्या सूरजने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधून स्वत:चं आणि महाराष्ट्राचं नाव खूप मोठं केलं आहे. तुम्ही हा सिनेमा नक्की बघा…”
याचबरोबर वर्षा उसगांवकरांनी सूरजबरोबर ‘झापुक झुपूक’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. संपूर्ण एनर्जीसह डान्स करून अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सर्व स्तरांतून या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत आहे.
सूरज हा डान्स व्हिडीओ शेअर करत लिहितो, “आपल्या महाराष्ट्राच्या सुपरडुपर टॉपच्या क्वीन आणि ‘बिग बॉस’च्या घरातल्या माझ्या आई वर्षा उसगांवकर ताई यांच्याबरोबर ‘झापुक झुपूक‘वर नाचलो व्हू….जब्बर मजा आली. आज वर्षा ताईंच्या आईला सुद्धा भेटलो. त्यांच्याकडून सुद्धा आशीर्वाद घेता आले…याचा खूप खूप आनंद आहे. वर्षा ताई तुमच्या आणि आईंनी दिलेल्या आशीर्वादासाठी खूप खूप आभार…”
वर्षा उसगांवकर आणि सूरज चव्हाणच्या डान्सवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आपल्या हक्काचा हिरो”, “एक नंबर”, “Only झापुक झुपूक” अशा असंख्य प्रतिक्रिया चाहत्यांकडून या व्हिडीओवर आल्या आहेत.