Suraj Chavan Film Zapuk Zupuk : सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक‘ चित्रपट तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. हा चित्रपट ज्यांनी अद्याप पाहिला नसेल त्या मराठी चित्रपट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘झापुक झुपूक‘ हा चित्रपट मंगळवारी म्हणजेच २९ एप्रिल रोजी, प्रेक्षकांना फक्त ९९ रुपयांमध्ये थिएटरमध्ये पाहता येणार आहे. निर्मात्यांनी सूरजच्या चाहत्यांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे.

‘झापुक झुपूक’ हा कौटुंबीक मनोरंजन करणारा मराठी चित्रपट शुक्रवारी, २५ एप्रिलपासून थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे यांच्या सारख्या कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयामुळे ‘झापुक झुपूक’ सर्वत्र लोकप्रिय ठरत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. सूरजच्या अभिनयाचं त्याच्या चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

zapuk zupuk 99 rupees
फक्त ९९ रुपयांत पाहता येणार झापुक झुपूक (फोटो – पीआर)

तुम्ही जर सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट अद्याप पाहिला नसेल आणि पाहायचा विचार करत असाल तर मंगळवारी २९ एप्रिलला सिनेमागृहांमध्ये फक्त ९९ रुपयांत पाहू शकता. ही ऑफर फक्त एकाच दिवसासाठी ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, लोकप्रिय मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘बिग बॉस मराठी ५’ च्या ग्रँड फिनालेमध्ये रीलस्टार सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर चित्रपटाचं कास्टिंग सुरू झालं आणि अनेक दिग्गजांची वर्णी यात लागली. हा चित्रपट केदार शिंदे व टीमने अवघ्या ६ महिन्यात तयार केला आणि प्रेक्षकांच्या भेटीला आणला. पण चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.

‘झापुक झुपूक’ प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. या ३ दिवसांची कमाई एक कोटींपेक्षाही कमी आहे. आधीच्या दोन दिवसांपेक्षा रविवारी तिसऱ्या दिवशी मोठी घट झाली. आता या आठवड्यात चित्रपट किती कमाई करणार, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.