Suraj Chavan Reaction On Zapuk Zupuk Trolling : ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणचा हिरो म्हणून पहिला सिनेमा ‘झापुक झुपूक’ २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला. सूरज हा सोशल मीडिया स्टार असून, शालेय शिक्षण पूर्ण न झाल्याने त्याला लिहिता-वाचता येत नाही. त्यामुळे या सिनेमासाठी दिग्दर्शक केदार शिंदेंनी सूरजकडून प्रचंड मेहनत करून घेतली आहे. सध्या या सिनेमाची महाराष्ट्रात जोरदार चर्चा चालू आहे. अनेकांनी सूरजचं भरभरून कौतुक केलं आहे. मात्र, काही लोकांनी अभिनेत्याला ट्रोल केलं आहे.
सूरजचा सिनेमाला जाणूनबुजून ट्रोल करायचं हे अनेकांनी आधीपासूनच ठरवलं होतं, असा दावा दिग्दर्शक केदार शिंदेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये केला होता. यादरम्यान, सूरजने सर्वांना ‘माझा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा…गावाकडच्या मुलाला पाठिंबा द्या’ असं आवाहन केलं. या लाइव्ह सेशननंतर अनेक इन्फ्लुएन्सर्सनी सूरजला पाठिंबा देत चाहत्यांना थिएटर्समध्ये जाऊन हा सिनेमा पाहण्याची विनंती केली आहे.
या सगळ्या प्रकरणावर सूरजने आता एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना स्पष्ट उत्तर दिलं आहे. या पोस्टमध्ये थिएटरमध्ये जाऊन ‘झापुक झुपूक’चा शो पाहणाऱ्या प्रेक्षकांची सूरज भेट घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान, सूरजला पाहून त्याची एक चाहती प्रचंड भावुक झाली होती. चित्रपट पाहिल्यावर आणि त्यानंतर प्रत्यक्ष सूरजला पाहून या चाहतीला रडू कोसळलं होतं…असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
सूरजची टीम याबद्दल पोस्ट शेअर करत लिहिते, “मी आज एल्प्रो चिंचवड येथील थिएटरमध्ये जाऊन आपला सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची भेट घेतली. मला जे नावं ठेवतात, आमच्या सिनेमाबद्दल नको-नको ते व्हिडीओ शेअर करतात. त्यापेक्षा माझी लोक माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतात. माझी ही सगळी लोक माझ्यासाठी खूप म्हणजे, खूप म्हणजे… खूप जास्त महत्त्वाची आहेत. त्यांच्यासाठी मी आयुष्यभर मेहनत करणार आणि तुम्हाला आयुष्यभर हसवणार…तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्याबरोबर असाच राहुद्या…तुमचाच सूरज”
दरम्यान, सूरजच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सर्वांनी सूरजच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे.