Bigg Boss Marathi 5 फेम सूरज चव्हाण सध्या त्याच्या ‘राजाराणी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. १८ ऑक्टोबरला सूरज चव्हाणची भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, आता या चित्रपटावर अन्याय होतोय, अशा आशयाचा एक व्हिडीओ सूरजच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

काय म्हणाला सूरज चव्हाण?

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सूरज म्हणतो, “नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आमच्या ‘राजा राणी’ चित्रपटावर अन्याय होतोय. त्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. थिएटरमध्ये जा, पिक्चर बघा आणि सपोर्ट करा”, असे म्हणत प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन त्याने केले आहे.

सूरजनंतर चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारा रोहन पाटीलने म्हटले, “आता सूरजने म्हटल्याप्रमाणे ‘राजा राणी’ हा सिनेमा १८ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. मी स्वत: त्यामध्ये भूमिका साकारली आहे. सूरज मोठ्या भूमिकेत आहे. बिग बॉसनंतर सूरज पहिल्यांदाच ‘राजाराणी’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर दिसत आहे. खूप चांगला सिनेमा बनला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही लोकांकडून असे म्हटले जात आहे की, हा सिनेमा बंद करण्यात यावा, बॅन करावा. गरीब पोरं जर मोठी होत असतील किंवा संघर्षाला यश मिळत असेल तर काही लोकांना खपत नाही, असं म्हटलं जातं. तर महाराष्ट्राच्या जनतेला मला हे सांगायचं आहे की, काही लोकं जरी म्हणत असली की हा सिनेमा बंद करा, तरी हा सिनेमा मोठ्या ताकदीनं सुरू राहील. आमच्यावर कितीही अन्याय झाला तरी महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे की ते या सिनेमाला भरभरून प्रतिसाद देतील, प्रेम करतील. जसा सूरजला बिग बॉसमध्ये पाठिंबा दिला, तसाच या चित्रपटालासुद्धा पाठिंबा देतील.”

हेही वाचा: Video : बॉलीवूडची ‘स्त्री’ करणार दिवाळीची साफसफाई; मराठमोळ्या शैलीत श्रद्धा कपूर म्हणाली, “घर चकचकीत…”

‘राजा राणी’ चित्रपटातून समाजाला चूकीचा संदेश दिला जात आहे, तो घातक आहे. सूरज चव्हाण प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे चित्रपटातील अनुकरण अनेकजण करू शकतात. चित्रपटाच्या शेवटी नातेवाईक आणि समाजामुळे प्रेम करणारे जोडपे एकत्र येऊ शकत नाही म्हणून ते एकमेकांवर गोळ्या झाडून आत्महत्या करतात. हा चित्रपटातून जाणारा संदेश चूकीचा आहे. म्हणून चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी. अन्यथा कायदेशीररित्या बंदी घातली जाईल, असे अ‍ॅड. वाजिद खान (बिडकर) यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मीडिया इन्फ्ल्युएन्सर सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. आपल्या हटके डायलॉगमुळे प्रसिद्ध असणाऱ्या सूरजने बिग बॉसच्या घरात आपल्या स्वभावाने प्रेक्षकांचे मन जिंकले आणि तो या पर्वाचा विजेता ठरला. सूरजला संपू्र्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सूरजची भूमिका असलेला ‘राजा राणी’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. याबरोबरच दिग्दर्शक केदार शिंदे यांनीदेखील सूरजची मुख्य भूमिका असलेला ‘झापूक झुपूक’ चित्रपट करणार असल्याची घोषणा केली आहे. आता त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.