‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘झापूक झुपक’ (Zapuk Zupuk) असं त्याच्या चित्रपटाचं नाव असून नुकतंच या चित्रपटातील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

शीर्षक गीताच्या प्रमोशनसाठी सूरज नुकताच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गेला होता. ‘मुंबई इंडियन्स’ (MI) विरुद्ध ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’ (RCB) या सामन्यात सूरजच्या चित्रपटातलं ‘झापुक झुपूक’ गाणं स्टेडियममध्ये वाजवण्यात आलं. सूरजसाठी हा अनुभव नवीन आणि पहिलाच होता. या पहिल्या अनुभवाबद्दल त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘रेडिओ सिटी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सूरजने याविषयी भावना व्यक्त केल्या.

यावेळी सूरजला इतक्या मोठ्या स्टेडियमवर जाण्याचा तुझा हा अनुभव कसा होता? असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत सूरजने म्हटलं की, “‘मुंबई इंडियन्स’ (MI) विरुद्ध ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’ (RCB) हा सामना खूप अटीतटीचा झाला. माझा स्टेडियमवर जाण्याचा पहिलाच अनुभव होता. इतक्या मोठ्या स्टेडिअममध्ये मी कधी गेलो नव्हतो. त्यामुळे सुरुवातीला खूप भीती वाटली. पण नंतर म्हटलं जे होईल ते होईल. आई मरी माता. शिव शंभो. हरहर महादेव. गणपती बाप्पा मोरया. हवा करून टाकली.”

सूरजच्या या नवीन गाण्याबद्दल बोलायचं झालं तर ‘तांबडी चांबडी’ गाणं फेम कृणाल घोरपडे उर्फ ‘क्रेटेक्स’ने या गाण्याला संगीत दिलं आहे. ‘तांबडी चामडी’च्या यशानंतर क्रेटेक्स त्याचं ‘झापुक झुपूक’ हे आगामी नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पट्या द डॉकने या गायकाने हे गाणं गायलं आहे, तर प्रतीक बोरकर या गाण्याचा गीतकार आहे.

दरम्यान, या चित्रपटात सूरजसह अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.