Zapuk Zupuk box office collection day 4 : सध्या ‘झापुक झुपूक‘ या मराठी चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. रीलस्टार व ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने ‘झापुक झुपूक’मधून सिनेविश्वात पदार्पण केलं आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ने चौथ्या दिवशी किती कमाई केली, त्याची आकडेवारी समोर आली आहे.
केदार शिंदे यांनी ‘झापुक झुपूक’ची घोषणा केल्यापासून याबद्दल जोरदार चर्चा होती. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या फिनालेमध्ये केदार यांनी सूरजला घेऊन ‘झापुक झुपूक’ सिनेमा करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली व तो २५ एप्रिल २०२५ ला रिलीज करण्यात आला.
सूरज चव्हाणच्या या चित्रपटाबद्दल टीझर व ट्रेलरनंतर लोकांमध्ये जेवढी क्रेझ पाहायला मिळत होती, तेवढी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर दिसत नाही. परिणामी ‘झापुक झुपूक’ फार चांगली कमाई करू शकलेला नाही. सलग चार दिवस या चित्रपटाने लाखांमध्ये कमाई केली आहे. ‘झापुक झुपूक’चे ४ दिवसांचे कलेक्शन जाणून घेऊयात.
‘झापुक झुपूक’चे ४ दिवसांचे कलेक्शन
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ ने भारतात पहिल्या दिवशी २४ लाख रुपयांचे कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी देखील ‘झापुक झुपूक’ चित्रपटाने २४ लाखांचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सूरजच्या सिनेमाने फक्त १९ लाखांचे कलेक्शन केले. चौथ्या दिवशी, सोमवारी ‘झापुक झुपूक’ ने १४ लाख रुपये कमावले. ‘झापुक झुपूक’ चे ४ दिवसांचे कलेक्शन ८१ लाख रुपये झाले आहे.
आज ९९ रुपयांत पाहता येणार झापुक झुपूक
केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘झापुक झुपूक‘ हा चित्रपट आज मंगळवारी म्हणजेच २९ एप्रिल रोजी, प्रेक्षकांना फक्त ९९ रुपयांमध्ये थिएटरमध्ये पाहता येणार आहे. निर्मात्यांनी सूरजच्या चाहत्यांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे.
‘झापुक झुपूक’ हा कौटुंबीक मनोरंजन करणारा मराठी चित्रपट शुक्रवारी, २५ एप्रिलपासून थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे यांच्या सारख्या कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयामुळे ‘झापुक झुपूक’ सर्वत्र लोकप्रिय ठरत आहे.