Zapuk Zupuk Movie New Song: सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या जबरदस्त टीझर, ट्रेलरनंतर गाण्यांनी प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढवली आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. नुकतंच चित्रपटातील नवीन धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यात सूरज चव्हाणचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत असला तरी त्याच्याबरोबर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील काही कलाकारही थिरकताना दिसत आहेत.

‘झापुक झुपूक’ चित्रपटातील नवीन गाण्याचं नाव ‘वाजीव दादा’ असून हे गाणं मेटाच्या सहयोगानं प्रदर्शित झालं आहे. पहिल्या दोन गाण्यांना मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर ‘झापुक झुपूक’ चित्रपटातील हे खास हळदीचं गाणं कमाल करत आहे. मराठी हळदी गाण्याच्या शोधात असाल, तर हे गाणं तुमच्या लग्नाच्या प्लेलिस्टमध्ये अवश्य जोडा. मस्तीनं पुरेपूर आणि उत्साहनं भरपूर असलेलं असं हे पारंपरिक उत्साहात भर टाकणार आहे. हळदीच्या तेजस्वी पिवळ्या रंगाप्रमाणेच हे मजेदार गाणं आहे.

‘वाजीव दादा’ हे गाणं सूरज चव्हाणसह जुई भागवत, हेमंत फरांदे आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामधील काही कलाकारांवर म्हणजेच जान्हवी किल्लेकर, छोटा पुढारी, वैभव चव्हाण, इरिना आणि पुरुषोत्तम पाटील यांच्यावर चित्रित केलं गेलं आहे. गाण्यात या सर्वांचा कल्ला आणि एकमेकांसोबतची जुगलबंदी पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे पहिल्यांदा मेटानं जिओ स्टुडिओजच्या सहयोगानं मराठी गाणं त्यांच्या मुंबई ऑफिसमधून प्रदर्शित केलं. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे, तसंच सूरज चव्हाण आणि त्याचे काही ‘बिग बॉस’च्या घरातील मित्र पुरुषोत्तम पाटील, जान्हवी किल्लेकर, छोटा पुढारी हे देखील उपस्थित होते. ‘वाजीव दादा’ हे गाणं गायक चंदन कांबळे आणि ज्ञानेश्वरी कांबळे यांनी गायलं आहे. तर संगीतकार आणि लेखक खुद्द चंदन कांबळे हे आहेत. प्रत्येकालाच थिरकायला लावणारं हे गीत आहे. तर आता हळदी समारंभ भारतीय पद्धतीनं ‘वाजीव दादा’च्या अंदाजात साजरी करायला एका नवीन गाण्याची भर पडली आहे.

चित्रपटाची भरभरून होणारी चर्चा, गाण्यांना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि आज खुद्द मेटाच्या ऑफिसमध्ये ‘वाजीव दादा’ हे गाणं प्रदर्शित झालं म्हणून आपला आनंद व्यक्त करत दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, “चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये सर्वत्र उत्सुकतेच वातावरण आहे. ‘झापूक झुपूक’चं शीर्षक गीत आणि ट्रेलरला पण भरभरून प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आज माझ्या ‘झापूक झुपूक’ चित्रपटाचं तिसरं गाणं ‘वाजीव दादा’ मेटाच्या सहयोगानं प्रदर्शित केलं गेलं. त्यासाठी मी आभारी आहे कारण त्यांनी मराठी चित्रपटाच्या या गाण्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य केलं आहे. जिओ स्टुडिओज तर ‘बाईपण भारी देवा’पासूनच माझ्याबरोबर माझ्या पाठीशी खंबीरपणे माझी साथ देतोय”.

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती बेला केदार शिंदे, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सूरज चव्हाणसह इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे.