‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून घराघरांत पोहोचलेला सोशल मीडिया स्टार म्हणजे सूरज चव्हाण (Suraj Chavan). आपल्या अतरंगी व्हिडीओमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत राहणारा सूरज त्याच्या आगामी ‘झापुक झुपूक’ (Zapuk Zupuk) या चित्रपटातून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरजचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रमोशनलाही सुरुवात झाली आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच डिसेंबर २०२४ मध्ये ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला होता. त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं. त्यानंतर काही दिवसांनी चित्रपटाचा पहिला टीझर व्हिडीओ समोर आला होता. अशातच आता या चित्रपटाचा आणखी एक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला असून यात चित्रपटातील सर्व कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.
‘झापुक झुपूक’मध्ये सूरज चव्हाणबरोबरच सूरजसह अभिनेता इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार दिसत आहेत. तसंच त्यांच्या भूमिका जरा हटकेच आहेत. या चित्रपटात मिलिंद गवळी हे नायिकेच्या वडिलांच्या तर दीपाली पानसरे आईच्या भूमिकेत आहेत. शिवाय जुई भागवत ही मुख्य नायिका दाखवण्यात आली आहे. तर पायल जाधव ही अभिनेत्री सूरजच्या बहिणीची भुमिका साकारत आहे. याशिवाय इंद्रनील कामत हा सूरजच्या खास मित्राची भूमिकेत आहे.
या नवीन टीझर व्हिडीओमुळे आता सूरजच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याला मोठ्या पडद्यावर आणि एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. तशा प्रतिक्रियाही चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे सूरजचा ‘झापुक झुपूक’ चित्रपटगृहांमध्ये काय जादू करणार हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट येत्या २५ एप्रिलपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, बेला शिंदे व जिओ स्टुडिओजने केली आहे.