Suraj Chavan Zapuk Zupuk Movie : मराठी कलाविश्वात सध्या सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं आहे. येत्या २५ एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने सध्या सूरजसह चित्रपटाची टीम ‘झापुक झुपूक’चं जोरदार प्रमोशन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सर्वांचा लाडका ‘गुलीगत किंग’ खास आयपीएलची मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमला जाणार आहे.

सूरज चव्हाणच्या चित्रपटातलं ‘झापुक झुपूक’ हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. आज वानखेडेवर होणाऱ्या ‘मुंबई इंडियन्स’ ( MI ) विरुद्ध ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’ (RCB) दरम्यानच्या सामन्यात सूरजच्या चित्रपटातलं ‘झापुक झुपूक’ गाणं स्टेडियममध्ये वाजवण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित क्रिकेटप्रेमी या गाण्यावर ठेका धरतील.

सूरज म्हणाला, “आज मुंबई इंडियन्स विरुद्ध RCB च्या सामन्यामध्ये आपलं ‘झापुक झुपूक’ गाणं वाजणार आणि ह्यो तुमचा टॉपचा किंग सगळीकडे गाजणार!” ‘गुलीगत किंग’ एकदम हटके लूक करून ही मॅच पाहण्यासाठी पोहोचला आहे. ‘मुंबई इंडियन्स’ची जर्सी आणि हटके जीन्स असा लूक करून सूरज वानखेडेवर पोहोचला आहे.

सूरजच्या जीन्सवर “बुक्कीत टेंगूळ”, “दिलात ‘झापुक झुपूक” अशा त्याच्या गाजलेल्या डायलॉगचे पॅच लावण्यात आले आहेत. चाहत्यांनी सूरजला एवढी मोठी संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. तसेच सूरजला या सिनेमासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

दरम्यान, ‘झापुक झुपूक’ गाण्याबद्दल सांगायचं झालं, मराठी रॅप आणि हिप-हॉप गाणी बनवणारा, मराठमोळा कृणाल घोरपडे उर्फ क्रेटेक्स हा या गाण्याचा संगीतकार आहेत. ‘तांबडी चामडी’च्या यशानंतर, क्रेटेक्स हे नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पट्या द डॉक (Patya the Doc) याने हे गाणं गायलं आहे. तर, या गाण्याचा गीतकार प्रतीक बोरकर आहे.

दरम्यान, सूरज चव्हाणसह या चित्रपटात जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.