Suraj Chavan Zapuk Zupuk Trailer : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणला घेऊन ‘झापुक झुपूक’ नावाचा चित्रपट करणार असल्याची घोषणा ‘बाईपण भारी देवा’चे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली होती. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. अखेर बहुप्रतिक्षीत ‘झापुक झुपूक’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा उत्कंठावर्धक ट्रेलर सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.

केदार शिंदे २५ एप्रिल २०२५ रोजी ‘झापुक झुपूक’ हा कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यास येत आहेत. शुक्रवारी या सिनेमाचा धमाल ट्रेलर रितेश देशमुखच्या हस्ते लाँच करण्यात आला. ‘झापुक झुपूक’चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे अभिनेता रितेश देशमुखचा सूरज चव्हाण खूप मोठा चाहता आहे आणि बिग बॉस सीजन ५ च्या यशानंतर रितेश सूरजच्या या खास क्षणात सामील झाला.

सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक’ आनंदाची मेजवानी घेऊन आलाय. रोमांस, अॅक्शन , ड्रामा या सर्व गोष्टी ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. सूरज चव्हाणची स्टाईल आणि धमाकेदार डायलॉग्सही यामध्ये आहेत. ट्रेलरमध्ये दोन कमाल गाण्यांची झलकसुद्धा पाहायला मिळते. या चित्रपटात सूरज आणि जुई भागवतची जोडी पाहायला मिळणार आहे.

शाळेत शिकवायला येणारी नारायणी, शिपाई असलेला सूरज, सूरज व नारायणीची मैत्री, पुढे प्रेम अन् नंतर येणारा एक मोठा ट्विस्ट या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. ट्रेलरमध्ये सूरजला अॅक्शन अवतारात दाखवण्यात आलं आहे. एकंदरीतच खिळवून ठेवणारा हा ट्रेलर आहे, त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

पाहा ट्रेलर

ट्रेलर लाँच कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखने ‘झापुक झुपूक’च्या प्रवासाबद्दल सांगितलं. “बिग बॉसची सुरुवात झाली तेव्हा माझा आणि सूरजचा तो पहिला प्रवास होता. केदार भाऊंसाठी सुद्धा तो पहिला प्रवास होता. सूरज जेव्हा बॉग बॉसच्या घरात तिसऱ्या आठवड्यात होता तेव्हाच केदार भाऊंनी सूरजवर सिनेमा बनवण्याचं ठरवलं होतं. त्यांनी त्यावेळी मला म्हंटलं होतं की ‘विजेता कोणीही असू दे, मी सूरजवर चित्रपट बनवणार’ आणि या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. सूरज जिंकल्यामुळे सिनेमा बनवण्यात आलाय, असं नाही. केदार भाऊंच्या हिम्मत आणि कंमिटमेंटला माझा सलाम आहे. या सिनेमाचं संगीत, एडिटिंग, स्टोरी सगळंच अप्रतिम आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे. सूरज आणि संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. महाराष्ट्रतील प्रेक्षक आणि सूरजचे चाहते नक्कीच सिनेमागृहात जाणार आहे ह्यात मला काहीच शंका नाही. मला सूरजचा खूप अभिमान आहे. जिओ स्टुडिओजचं सुद्धा खूप अभिनंदन की ते वेगवेगळे प्रयोग करुन नवीन नवीन विषय प्रेक्षकांसमोर आणतात,” असं रितेश देशमुख म्हणाला.

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, “सूरजला घेऊन बिग बॉस मराठी सुरू असताना मला ‘झापुक झुपूक’ची कल्पना सुचली. मी कलर्स मराठीचा प्रोग्रामिंग हेड असल्या कारणामुळे बिग बॉसची जबाबदारी माझ्यावर होती. त्यावेळी माझं आणि रितेशचं खूप बोलणं सुरु असायचं तेव्हाच मी ती कल्पना त्यांना सांगितली. रितेश भाऊंना ही कल्पना भयंकर आवडली आणि त्यांनी सुद्धा मला सांगितलं की जर माझ्याकडे उत्तम गोष्ट आहे तर मी ती पुढे आणावी. आज या ट्रेलरच्या माध्यमातून मी एक सुंदर गोष्ट प्रेक्षकांसमोर आणतोय आणि ह्या वेळेस सुद्धा रितेश भाऊ माझ्या सोबत उभे आहेत याचा मला आनंद आहे.”

‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरजसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ही गोष्ट आहे. एका लव्हस्टोरी सोबतच वेग वेगळ्या भावनांचा मिश्रण या सिनेमात पाहायला मिळणार आहे. ‘झापुक झुपूक’ २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.