Suresh Wadkar on Anand Dighe: प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर: मुक्कामपोस्ट ठाणे या हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा पुढचा भाग धर्मवीर २ आता ९ ऑगस्टला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. यावेळी गायक सुरेश वाडकर यांनी आनंद दिघेंची आठवण सांगितली. मी आनंद दिघेंना पाहिलं की भीत वाटायची असं त्यांनी म्हटलं आहे आणि एक किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धर्मवीर २ चा म्युझिक लाँच सोहळा

धर्मवीर २ या चित्रपटाचं म्युझिक लाँच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते ठाण्यातील गडकरी रंगायतन इथं मोठ्या दिमाखात पार पडलं. यावेळी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, म्युझिक टीम आणि इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची गाणी अल्पावधीतच प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता ‘धर्मवीर २’ या चित्रपटातील गाणी पाहिल्यानंतर चित्रपटाचं कथानक, कलाकार यांविषयी लोकांना खूप उत्सुकता आहे. ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशा टॅगलाईनसह या सिनेमाचा टिझर आला आहे. सिनेमात काय काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे पण वाचा- Dharmaveer 2 : ‘तुम्हाला खरे वाटणार नाही पण…’ मंगेश देसाई यांनी सांगितला ‘धर्मवीर २’चा प्रवास

सुरेश वाडकर यांनी आनंद दिघेंबाबत काय म्हटलं आहे?

” मी दिघेसाहेबांना जवळून भेटलो आहे. त्यांच्याकडे पाहिलं की मला भीती वाटायची पण ते मनाने एकदम निर्मळ होते. धर्मवीर २ हा सिनेमा ९८ आठवडे चालावा अशा मी शुभेच्छा देतो. तसंच मला इथे बोलवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.” असं सुरेश वाडकर यांनी म्हटलं आहे.

सुरेश वाडकर यांची धर्मवीर २ च्या म्युझिक लाँचला विशेष उपस्थिती होती.

गुरुपौर्णिमा या गाण्याचं खास सादरीकरण

गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने तब्बल ४५ बाल कलाकारांनी पहिल्यांदाच धर्मवीर चित्रपटातील “गुरुपौर्णिमा” हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. स्वर्गीय आनंद दिघे यांनी राजकारण आणि समाजकारणाचा सुंदर मेळ घातला होता. त्यामुळेच ते खूप लोकप्रिय झाले होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा सुरू करण्याचा पहिला प्रयत्न दिघे साहेबांनीच सुरू केला होता. त्यामुळे चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात गुरूपौर्णिमा गाण्याच्या सादरीकरणासह “चला करू तयारी…” हे गाणं उपस्थितांना दाखविण्यात आलं. त्याचप्रमाणे दहावीतील परीक्षेतील उत्तम गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचं “आनंद माझा” पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आलं.

मराठी आणि हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित

‘धर्मवीर २’ या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे, डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश – विश्वजीत आणि चिनार-महेश यांचं सुमधुर संगीत लाभलं आहे. तर ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, जावेद अली, सुखविंदर सिंग, विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे, बेला शेंडे यांच्या आवाजात मराठी आणि हिंदी भाषेत स्वरबद्ध करण्यात आली आहेत. आजपासून (१५ जुलै) ‘धर्मवीर २’ या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना विविध म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh wadkar shared his experience with anand dighe in the music launch dharmaveer 2 rno news scj