मराठी सिनेसृष्टीतील ‘हास्यसम्राट’ अशी ओळख असणारे सर्वांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज वाढदिवस. आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने लक्ष्या मामांनी रसिकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. मराठी सिनेसृष्टीत जवळपास दोन दशकं अक्षरशः लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावाने धुमाकूळ घातला. जरी ते आज हयात नसले तरी मराठी सिनेरसिकांच्या मनात कायम असतील. कारण त्यांना विसरणं कुणालाही शक्य नाही, असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही.
१९८४ साली ‘लेक चालली सासरला’ चित्रपटाद्वारे लक्ष्मीकांत बेर्डेंनी खऱ्या अर्थानं मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘धुमधडाका’ चित्रपटामुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. मग ‘गडबड गोंधळ’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘दे दणादण’, ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘मज्जाच मज्जा’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘फेकाफेकी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘भुताचा भाऊ’, ‘थरथराट’, ‘हमाल दे धमाल’, ‘धडाकेबाज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत यांनी विनोदीसह गंभीर भूमिका केल्या. या भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसठशीतपणे कोरल्या गेल्या आहेत.
हेही वाचा – Laxmikant Berde Birthday: मी आलो.. मी पाहिलं.. मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने लेक स्वानंदी बेर्डेने भावुक फोटो शेअर केली आहे. स्वानंदीने वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक फोटो शेअर करून लिहीलं आहे की, ६९वा वाढदिवस…तुमची आठवण येते…
स्वानंदी केलेल्या या पोस्टवर लक्ष्या मामांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक चाहत्यानं लिहिलं आहे की, ज्यांचे चित्रपट बघत आम्ही लहानाचे मोठे झालो…त्यांना विसरणे कधीच शक्य नाही…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं आहे की, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या महान अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. वी मिस यू. तसेच तिसऱ्या चाहत्यानं लिहीलं आहे की, कायम आठवण येते.
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ताबरोबर घडणार ‘ही’ वाईट गोष्ट, पाहा व्हिडीओ
दरम्यान, स्वानंदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तसेच तिने ‘धनंजय माने इथेच राहतात’ या नाटकातून रंगमंचावरही पदार्पण केलं. या नाटकात स्वानंदीबरोबर तिची आई प्रिया बेर्डे मुख्य भूमिकेत आहेत.