मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘बाई गं’ चित्रपटात स्वप्नील जोशी झळकणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. पण, जेव्हा एक नाही चक्क सहा बायका एखाद्या पुरुषाच्या पाठिशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल? हे येत्या १२ जुलैला ‘बाई गं’ या चित्रपटातून आपल्याला कळणार आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी सहा हरहुन्नरी अभिनेत्रींबरोबर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या ‘बाई गं’ चित्रपटाविषयी चर्चा रंगली आहे.
‘बाई गं’ या आगामी चित्रपटात स्वप्नील जोशीसह अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान झळकणार आहेत. तसंच अभिनेता सागर कारंडेही महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये झालं होतं. त्यामुळे आता चित्रपटातील बऱ्याच कलाकारांचे लंडनमधील व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. सध्या स्वप्नील जोशी व नेहा खानच्या रोमँटिक डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री नेहा खानने तिच्या इन्स्टाग्रामवर स्वप्नील जोशीबरोबरचा रोमँटिक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. “माझ्या आवडत्या गाण्यावर, माझ्या आवडत्या अभिनेत्याबरोबर, माझ्या आवडत्या देशात रोमान्स करणं, यामुळे माझ्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण झाली,” असं कॅप्शन लिहित नेहाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, स्वप्नील व नेहा लंडन ब्रिजजवळ रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. ऋषी कपूर व श्रीदेवी यांच्या ‘मितवा’ गाण्यावर दोघं थिरकले आहेत. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, स्वप्नीलच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘बाई गं’ शिवाय बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ या बहुचर्चित चित्रपटात तो झळकणार आहे. तसंच स्वप्नील प्रसाद ओक, अभिनेत्री शिवानी सुर्वे, पर्ण पेठे यांच्यासह ‘जिलबी’ चित्रपटात दिसणार आहे.