रिमझिमत्या प्रेमाने दुनियेला मोहिनी घालणारं ‘बाई गं’ चित्रपटाचं नवीन गाणं ‘चांद थांबला’ नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मराठी मनोरंजन विश्वातील रोमँटिक हिरो अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात आपल्या जुन्या ऑनस्क्रीन जोडीदाराबरोबर म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेसह ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसत आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मितवा’ चित्रपटात स्वप्नील आणि प्रार्थना एकत्र झळकले होते. आता ‘मितवा’नंतर ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र येणार आहे.
तब्बल ९ वर्षांनी प्रार्थना आणि स्वप्नील एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने ‘बाई गं’ चित्रपटाबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे. याआधी त्यांच्या ‘मितवा’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरभरून यश मिळालं होतं. ‘बाई गं’मधील ‘चांद थांबला’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्यात प्रार्थना स्वप्नीलबरोबर थिरकताना दिसत आहे. हे ‘बाई गं’ चित्रपटातील दुसरं गाणं आहे.
अभय जोधपूरकर आणि आनंदी जोशी यांनी ‘चांद थांबला’ या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर, वरूण लिखाते यांचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. या गाण्याचे बोल समीर सामंत यांनी लिहिले आहेत. ‘चांद थांबला’ हे गाणं प्रेक्षकांना इन्स्टाग्रामसह युट्यूबवर पाहता येणार आहे.
‘बाई गं’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. याशिवाय याचं संकलन निलेश गावंड यांनी केलं आहे. तर, चित्रपटाचं छायांकन नागराज एमडी दिवाकर यांचं आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील पहिलं गाणं ‘जंतर मंतर’ हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. यामध्ये स्वप्नीलसह वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्री झळकल्या आहेत.
दरम्यान, स्वप्नील जोशीबरोबर ‘बाई गं’ चित्रपटात सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान अशा सहा अभिनेत्री झळकणार आहेत. एक अभिनेता आणि तब्बल ६ अभिनेत्री ही संकल्पनाच प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. त्यामुळे यामागे नेमका काय ट्विस्ट आहे हे प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेल. १२ जुलैला ‘बाई गं’ हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.