Navra Maza Navsacha 2 : सचिन पिळगांवकर यांच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाने प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हा एव्हरग्रीन चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन पिळगांवकरांनी काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती.
‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. तब्बल १९ वर्षांनी निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. पहिल्या भागात सगळे कलाकार लालपरीने प्रवास करून गणपती पुळ्याला गेल्याचं पाहायला मिळालं. आता नव्या भागात नवस फेडायला वॅकी पुन्हा एकदा कोकणात जाणार असल्याचं समोर आलं आहे.
स्वप्नील जोशी दुसऱ्या भागात महत्त्वाची भूमिका साकारणार असून त्याने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर एकत्र रेल्वे प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. “चाललो नवस फेडायला! ‘नवरा माझा नवसाचा २'” असं कॅप्शन अभिनेत्याने या फोटोला दिलं आहे. यावरून हे दोघंही कोकणात शूटिंगसाठी जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. आता हा बहुप्रतीक्षित चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.