Swapnil Joshi : मराठी चित्रपटसृष्टीचा ‘मितवा’ म्हणून स्वप्नील जोशीला घराघरांत ओळखलं जातं. ‘दुनियादारी’, ‘तू ही रे’, ‘मितवा’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘वाळवी’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये स्वप्नीलने काम केलं आहे. मराठी मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणार हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्याला ओळखलं जातं. प्रेक्षकांच्या याच लाडक्या अभिनेत्याने वर्षाखेरीस सर्वांना एक आनंदाची बातमी दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टी गाजवणार स्वप्नील आता लवकरच एका गुजराती चित्रपटात झळकणार आहे.
स्वप्नील जोशी २०२५ मध्ये गुजराती चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या पहिल्या गुजराती चित्रपटाचं नाव आहे ‘शुभचिंतक’. या चित्रपटात स्वप्नीलबरोबर राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : Best नवरा, बाबा अन्…; रितेश देशमुखच्या वाढदिवशी जिनिलीयाची खास पोस्ट; कमेंट करत म्हणाला, “बायको तुझ्यासाठी…”
‘शुभचिंतक’ या चित्रपटाची निर्मिती पार्थिव गोहिल आणि मानसी पारेख त्यांच्या सोल सूत्र या बॅनरखाली करत आहेत. यापूर्वी ‘गोलकेरी’, ‘कच्छ एक्स्प्रेस’ आणि ‘झामकुडी’ या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. या तीन चित्रपटांच्या यशानंतर आता ‘शुभचिंतक’ त्यांच्या बॅनरचा चौथा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निसर्ग वैद्य यांच्याकडे आहे. हा चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रिलर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पहिल्या गुजराती चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना स्वप्नील म्हणाला, “गुजराती इंडस्ट्री गेल्या वर्षात वेगाने विकसित होत आहे आणि वैविध्यपूर्ण विषयांची निर्मिती त्याठिकाणी केली जात आहे. एक कलाकार म्हणून ही संधी माझ्यासाठी नक्कीच खास आहे आणि गुजराती चित्रपट विश्वात काहीतरी वेगळं करायला मिळतंय याचा मला आनंद आहे. मी नेहमीच मानसीची एक अभिनेत्री म्हणून प्रशंसा केली आहे आणि तिच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होत आहे. या भूमिकेने मला नक्कीच एक नवीन आव्हान दिलं आहे आणि ही भूमिका साकारण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे.”
चित्रपटाची मुख्य अभिनेत्री-निर्माती मानसी पारेख पुढे म्हणाली, “स्वप्नील या चित्रपटात ऑनबोर्ड झाला आहे याचा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे. स्वप्नीलबरोबर स्क्रीनस्पेस शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आम्ही लूक टेस्ट आणि वर्कशॉपसाठी आधीच भेटलो आहोत आमच्या सुरुवातीच्या नोट्सची देवाणघेवाण केली आणि आता शूटिंगला कधी एकदा सुरुवात होतेय यासाठी सगळेच आतुर आहेत.”