Swapnil Joshi New Car First Look : मराठी कलाविश्वाचा ‘मितवा’ म्हणून अभिनेता स्वप्नील जोशीला ओळखलं जातं. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘क्लासमेट’, ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’ अशा एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपटांमध्ये त्याने काम केलेलं आहे. स्वप्नीलच्या व्यावसायिक आयुष्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. पण, अभिनेत्याने नुकतीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातली आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
वर्षाखेरीस स्वप्नील जोशीच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालेलं आहे. ही पाहुणी म्हणजे त्याची डिफेंडर कार. ही नवीन गाडी खरेदी केल्यावर स्वप्नीलची खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली आहे. कारण, या आलिशान गाडीची किंमत कोटींच्या घरात आहे.
स्वप्नील जोशीने खरेदी केली आलिशान गाडी
स्वप्नील जोशीने मंगळवारी सायंकाळी ( ३ डिसेंबर ) नवीन कारची पहिली झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. “तर, आज ही खास गोष्ट घडली. डिफेंडर…माझी नवीन गाडी, स्वप्नपूर्ती” असं कॅप्शन अभिनेत्याने या फोटोला दिला आहे. स्वप्नीलचं नवीन गाडी खरेदी करण्यासाठी गेलेल्या शोरुममध्ये हटके स्वागत करण्यात आलं. याचे फोटो देखील अभिनेत्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
स्वप्नील गाडी खरेदी करण्यासाठी गेला असताना त्याच्या आजूबाजूला गाजलेल्या चित्रपटांमधले त्याचे संवाद पोस्टरसह लावण्यात आले होते. त्यामुळे ही सजावट सर्वांसाठीच लक्षवेधी ठरली आहे. नवीन गाडी खरेदी केल्यावर संपूर्ण कलाविश्वातून स्वप्नील जोशीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
हेही वाचा : मराठी सिनेमे हिंदीत डब का होत नाहीत? नाना पाटेकरांचा सवाल; प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’बद्दल म्हणाले…
दरम्यान, स्वप्नीलच्या ( Swapnil Joshi ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकताच तो ‘नवरा माझा नवसाचा २’ या सुपरहिट चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळालं. आता लवकरच स्वप्नील ‘जिलबी’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.