box office Collection day 1: शुक्रवारी (१२ जुलै रोजी) दमदार स्टारकास्ट असलेला एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. ‘बाई गं’ असं या चित्रपटाचं नाव आहे. स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) व सहा अभिनेत्री असलेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, त्याची आकडेवारी समोर आली आहे.
असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा एक नाही चक्क सहा बायकां असतील तर त्या पुरुषाची स्थिती काय असेल? हेच दाखवणारा ‘बाई गं’ सिनेमा शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची पहिल्या दिवसाची आकडेवारी पाहता प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे फारच निराशाजनक आहेत.
‘बाई गं’ मधील स्टारकास्ट
अभिनेता स्वप्नील जोशी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रीही आहेत. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या अभिनेत्री सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘मितवा’ नंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांची जोडी ‘बाई गं’ या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या जोडीचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे, जो सिनेमासाठी खूप उत्सुक होता. पण चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.
‘बाई गं’ ची पहिल्या दिवसाची कमाई
इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने या चित्रपटाच्या कमाईची पहिल्या दिवसाची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, स्वप्निल जोशीच्या ‘बाई गं’ने फक्त आठ लाख रुपयांची ओपनिंग केली आहे. सुरुवात निराशाजनक असली तरी शनिवार व रविवारी वीकेंड असल्याने या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, ‘बाई गं’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर याचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ चित्रपटाची गाणी खूप हिट झाली, पण या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे आकर्षित करण्यात यश आलं नाही.