परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपट येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते अशी मराठीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव एका वेगळ्या रुपात पाहायला मिळत आहे. सध्या ‘नाच गं घुमा’चं हे पहिलं पोस्टर चांगलंच चर्चेत आलं आहे.
‘नाच गं घुमा’ या चित्रपटाद्वारे अभिनेता स्वप्नील जोशी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. स्वप्नीलसह शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, तेजस देसाई व तृप्ती पाटील यांनी देखील या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. आज या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर करत स्वप्नीलने लिहिलं, “स्त्री ही घराची राणी असली तरी घर, नोकरी, मूल सांभाळताना अजून दोन हातांची मदत लागतेच. ते वरचे दोन हात असतात मोलकरणीचे, मालकीण-मोलकरणीचे सूर जुळले की गृहिणीची होते, महाराणी आणि मोलकरणीची होते परीराणी. या महाराणी-परीराणी, आपल्या हातावर पूर्ण संसार पेलून उभ्या असतात. तुमच्या आमच्या घरातल्या, घर चालवणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, दुसऱ्याचं घर सांभाळून आपलं घर चालवणाऱ्या नारीशक्तीला त्रिवार वंदन करून घेऊन येत आहोत…‘नाच गं घुमा’”
हेही वाचा – Video: अंबानींची धाकटी सून शाहरुख खानला म्हणाली ‘अंकल’, बादशहाने अक्षय कुमारचं नाव घेत दिली ‘ही’ रिअॅक्शन
स्वप्नील त्याच्या निर्मिती प्रवासाबद्दल बोलताना म्हणाला,”‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचा सह निर्माता होण ही माझ्यासाठी खूप आनंद देऊन जाणारी गोष्ट आहे. कायम परेश मोकाशीचे चित्रपट बघत आलो आणि मी त्यांचा चाहता आहे. म्हणून आयुष्यात एकदा तरी त्यांच्याबरोबर काम करायला मिळावं ही इच्छा होती आणि ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होते आहे. ‘वाळवी’पासून हा प्रवास सुरू होऊन आता ‘नाच गं घुमा’ पर्यंत येऊन पोहोचला आहे. मधुगंधा आणि परेश यांच्याबरोबर काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आणि या दोघांमुळे मी निर्मिती विश्वात पदार्पण करतोय.”
पुढे स्वप्नील म्हणाला, “नुकतंच चित्रपटाच चित्रीकरण पूर्ण होऊन आजच्या दिवशी चित्रपटाचं पोस्टर येणं आमच्या सगळ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे. उत्तम कथानक , उत्कृष्ट संगीत आणि चित्रपटाची संपूर्ण टीम या सगळ्यांचा मेळ जुळून येऊन ‘नाच गं घुमा’ घडतोय याचा खूप आनंद आहे. चांगल्या गोष्टींचा भाग होण्याचा अभिमान कायम असतो आणि यावेळी वेगळ्या भूमिकेत असल्याने हा अभिमान अजून जास्त वाढला आहे. कारण चांगल्या कलाकृतीचा भाग होण आणि आपल्या हातून चांगली कलाकृती एक निर्माता म्हणून घडणं ही खूप कमालीची बाब आहे. एक उत्तम माणूस घडताना आज माझ्या आयुष्यात स्त्री वर्गाचा खूप मोठा वाटा आहे आणि म्हणून ‘नाच गं घुमा’ सारखा चित्रपट माझ्याहातून घडणं हा निव्वळ योगायोग आहे असं मला वाटतं. लवकरच चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येईल कधी येणार? केव्हा येणार? यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. पण माझ्याबरोबर चित्रपटाची संपूर्ण टीम यासाठी उत्सुक आहे.”
हेही वाचा – मुनव्वर फारुकीला गँगस्टर म्हणत ‘बिग बॉस १७’ फेम स्पर्धकाने दिलं ओपन चॅलेंज, म्हणाला, “तुला दाखवतो…”
वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा स्वप्नील जोशी आता अभिनेत्याच्या पलीकडे जाऊन ‘निर्माता’ होतोय. येणाऱ्या काळात नक्कीच स्वप्नील उत्तम प्रोजेक्ट मधून दिसणार आहे यात शंका नाही.