Swapnil Joshi : अलीकडे मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी निर्मिती क्षेत्रात आल्याचे पाहायला मिळत आहेत. कलाकार म्हणून काम करत असतानाच निर्मिती क्षेत्राची जबाबदारीही अनेकांनी घेतल्याचे गेल्या काही वर्षांत पाहायला मिळाले आहे. यात मराठीतील प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडीत, प्रिया बापट, शर्मिष्ठा राऊत, श्वेता शिंदे, श्रुती मराठे, रितेश देशमुख, केदार शिंदे, भरत जाधव अशा अनेक कलाकारांची नावे आहेत. यातीलच आणखी एक नाव म्हणजे अभिनेता स्वप्नील जोशी.

स्वप्नील जोशी गेल्या दहा वर्षांपासून करतोय चित्रपट निर्मिती

‘नाच गं घुमा’ या चित्रपटानंतर तो निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण तुम्हाला माहीत आहे का? स्वप्नील गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट निर्मिती करत आहे. पण त्याने याआधी निर्माता म्हणून कधीच नाव दिलेलं नाही. ‘नाच गं घुमा’ या चित्रपटानंतर त्याने निर्माता म्हणून स्वत:चे नाव देण्यास सुरुवात केली. याबद्दल त्याने स्वत:च नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. तसंच इतकी वर्षे त्याने निर्माता म्हणून स्वत:चे नाव न लावल्याचे कारणही सांगितलं आहे

“मी एक व्यावसायिक अभिनेता आणि याचा मला अभिमान”

राजश्री मराठीशी बोलताना स्वप्नीलने असं म्हटलं की, “प्रत्येकाचं एकेक अंग असतं. प्रत्येकाची एकेक आवड असते. माझे अनेक समकालीन मित्र आहेत जे उत्तम कलाकार आहेत आणि नंतर ते उत्तम दिग्दर्शक झालेत. तर तो त्यांचा निर्णय होता. पण माझा निर्णय व्यवसाय करणं हा होता. माझा यावर विश्वास आहे की, मी एक व्यावसायिक अभिनेता आहे आणि मला याचा अभिमान आहे. माझा निर्णय कायमच निर्मिती करणं हा होता.”

“माझ्यासाठी नाव लावणं ही पैसे लावण्यापेक्षा मोठी गोष्ट”

यानंतर स्वप्नीलने असं म्हटलं की, “ही एक मजेशीर गोष्ट आहे की, मी गेली आठ-दहा वर्षे निर्मिती करतो आहे. अनेक चित्रपटांमध्ये तुम्हाला माझ्या आईचे नाव दिसेल. मी तेव्हापासून निर्माता आहे; फक्त तिथे माझं नाव लागत नव्हतं. कारण माझ्यासाठी नाव लावणं हे पैसे लावण्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी चित्रपटांसाठी पैसे गेली दहा वर्षे लावत आहे, पण निर्माता म्हणून नाव मी मागच्या वर्षी ‘नाच गं घुमा’ चित्रपटासाठी लावलं.”

“‘नाच गं घुमा’नंतर निर्माता म्हणून नाव लावण्यास सुरुवात”

यापुढे त्याने असं सांगितलं की, “मला असं वाटतं की, पैसे येतील आणि जातील; पण एकदा नाव गेलं की ते परत मिळवायला वेळ लागतो. त्यामुळे मी निर्माता म्हणून नाव लावायला खूप वेळ घेत होतो. मी गेली अनेक वर्षे आईच्या नावाने चित्रपट निर्मिती करत आहे. पण मग ‘नाच गं घुमा’च्या वेळेस असं वाटलं की, आता नाव लावलं पाहिजे आणि मग मी आता निर्माता म्हणून स्वत:चे नाव लावत आहे.” दरम्यान, निर्माता म्हणून स्वप्नीलचा नुकताच ‘सुशिला-सुजित’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.