काही कलाकार हे त्यांच्या भूमिकेतून त्यांची वेगळी ओळख निर्माण करतात. ज्येष्ठ मराठी अभिनेते राजशेखर(Rajshekhar) यांनी खलनायकाची पात्रे साकारत स्वत:ची ओळख निर्माण केली. आता त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग त्यांच्या मुलाने म्हणजेच अभिनेते स्वप्नील राजशेखर(Swapnil Rajshekhar) यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे.
स्वप्नील राजशेखर यांनी सांगितला वडिलांचा किस्सा
स्वप्नील राजशेखर यांनी काही दिवसांपूर्वी ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटले, “‘साधी माणसं’ आणि ‘मल्हारी मार्तंड’ या दोन चित्रपटांमुळे राजशेखर हे एका रात्रीत ‘द राजशेखर’ झाले. अक्षरश: एका रात्रीत ते स्टार झाले. स्टार झाल्यानंतर जेव्हा ते भालजी पेंढारकरांची पुढची फिल्म करत होते, तेव्हा एक डायलॉग ते चुकीचा बोलले तर भालजी पेंढारकरांनी पायावरती वेताच्या छड्या मारल्या होत्या. माझे वडील हे आयुष्यभर अभिमानाने सांगायचे की, मी असा राजशेखर म्हणून वैगेरे फिरायचो. भालजी पेंढारकरांच्याकडे गेलो, एक डायलॉग होता, त्याचा फक्त टोन चुकला; त्यांनी पायावर वेताच्या छड्या मारल्या. कसा बोलतोस डायलॉग?असे भालजी पेंढारकरांनी म्हटले. तर राजशेखर यांना असं वाटलं नाही की, अरे बाकीचे सगळे लोक आहेत, बाकीचा सगळा स्टाफ आहे. आता मी राजशेखर झालोय आणि हे मला मारतात. त्यांना त्याचा अभिमान वाटला. भालजी पेंढारकर हे त्यांचे दैवतच होते. वडिलांनी भालजी पेंढारकरांच्या पायावर पडून मी करतो असं सांगितलं”, असा राजशेखर यांचा किस्सा सांगत स्वप्नील राजशेखर यांनी म्हटले की आता असं आजच्या काळात होणार नाही.
राजशेखर यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘दागिना’, ‘ओवाळणी’, ‘शांती ने केली क्रांती’, ‘चिमणी पाखरे’, ‘आई शक्ती देवता’, ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’, ‘सर्जा राजा’, ‘सत्ताधीश’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.
स्वप्नील राजशेखर हे सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत चारुहासच्या भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेत चारुहास आणि चारुलताच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, स्वप्नील राजशेखर यांनी ‘राजा शिवछत्रपती’, ‘कुलस्वामिनी’, ‘खेळ मांडला’ अशा अनेक मालिका आणि चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.