सध्या बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे ऐतिहासिक चित्रपट आणि थोर लोकांच्या जीवनावर बेतलेले चरित्रपट म्हणजेच बायोपिक हे वरचेवर पाहायला मिळत आहेत. मोठमोठे कलाकार, गायक, तसेच स्वातंत्र्य सैनिक यांच्या जीवनावर बेतलेले बरेच चित्रपट गेल्या काही वर्षात प्रदर्शित झाले अन् त्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसादही दिला. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ज्येष्ठ गायक, अभिनेते व संगीतकार वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर बेतलेला ‘मी वसंतराव’ या चित्रपटालाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यानंतर शाहीर साबळे यांच्या जीवनावर बेतलेला ‘महाराष्ट्र शाहीर’देखील चांगलाच गाजला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता या पाठोपाठ लवकरच सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके म्हणजेच सगळ्यांचे लाडके बाबूजी यांच्या जीवनावर बेतलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्यावर्षी २५ जुलै म्हणजेच बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या आगामी चित्रपटाचा हा दुसरा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून एका प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचे जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ आणि त्याच्या निर्मात्यांवर विंदू दारा सिंहची टीका; अभिनेता म्हणाला, “ही एक घोडचूक…”

टीझरमधून प्रेक्षकांना बाबूजी यांच्या संगीतक्षेत्रातील प्रवासाबद्दल बरीच नवी माहिती मिळणार आहे याचा अंदाज येत आहे. तसेच या चित्रपटातील त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यातीलही बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला जाणार आहे हे या टीझरमधून स्पष्ट होत आहे. टीझरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात मागे ऐकू येणारी बाबूजी यांच्याच सुमधुर आवाजातील गाणी अन् त्याच्याशी साधर्म्य साधणारे दृश्य. यामुळे हा टीझर प्रेक्षकांना आणि खासकरून बाबूजींच्या चाहत्यांना भावला आहे. बाबूजी यांच्या जीवनातील वेगवेगळे टप्पे यात पाहायला मिळणर आहेत. टीझरमध्ये “माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून, ही आर्तता माझ्या स्वरात उतरते” असे एक वाक्य बाबूजींच्या तोंडी ऐकायला मिळते. या वाक्यातूनच आपल्याला ‘बाबुजीं’च्या खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते.

रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित, योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मृण्मयी देशपांडे, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद योगेश देशपांडे यांचे असून सौरभ गाडगीळ, योगेश देशपांडे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून आजवरचा हा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक ठरेल.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ” एखाद्या नावाजलेल्या व्यक्तिमत्वाचा जीवनपट पडद्यावर दाखवणे नक्कीच सोपे नसते. त्यासाठी सखोल अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. ‘बाबुजी’ हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. मला त्यांचा जीवनपट पडद्यावर दाखवायचा होता. यासाठी मी जमेल तितकी त्यांच्याविषयी माहिती मिळवली. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना मी भेटलो. त्यांच्याविषयी काही अशा गोष्टी कळल्या, ज्या अनेकांना माहित नाही. त्यांचे तेच आयुष्य मी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची गायली आपल्या सगळ्यांना माहित आहे, परंतु त्यामागचा संघर्ष खूप कठीण होता. त्यांचा हा प्रवास ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मध्ये पाहायला मिळणार आहे.”