दरवर्षीप्रमाणे आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जात आहे. देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषिक लोक राहतात. त्यामुळे आजचा दिवस जगाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सोशल मीडियाद्वारे कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. ‘तान्हाजी’ फेम अभिनेत्याने ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्ताने शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात कुसुमाग्रज यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली. त्यामुळे आज मातृभाषेचा गौरव करण्यासाठी व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिनवादन म्हणून ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडीत, अभिजीत केळकर अशा अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटात झळकलेला अभिनेता धैर्य घोलपने ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्ताने वेगळ्या शैलीत पोस्ट लिहिली आहे. धैर्यने इन्स्टाग्रामवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “प्रिय मराठी भाषा, २१ शतकाच्या प्रारंभी तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होणाऱ्या आमच्या पिढीला मातृभाषेचा फक्त जाज्वल्य नाही तर हृदयस्थ अभिमान कसा बाळगायचा ते आम्हाला ह्या माणसाने शिकवलं: राज ठाकरे.”
दरम्यान, धैर्यच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ‘तान्हाजी’ चित्रपटात तान्हाजी मालुसरेंच्या सैन्यातल्या मावळ्याच्या रुपात झळकला होता. त्यानंतर तो ‘अथांग’ या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळाला होता.