अभिनेता कैलास वाघमारे हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. कैलासने ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तो घराघरात प्रसिद्ध झाला. त्याबरोबरच शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाने कैलासला मोठी लोकप्रियता मिळाली होती. सध्या कैलास हा यशच्या शिखरावर पोहोचला आहे. पण या काळात त्याने अनेक कटु आठवणींचा सामना करावा लागला आहे.
कैलास वाघमारेची प्रमुख भूमिका असलेला गाभ हा मराठी चित्रपट येत्या मे महिन्यात प्रदर्शित होणरा आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याला सिनेसृष्टीत आलेल्या वाईट अनुभवाबद्दल भाष्य केले. “सिनेसृष्टीत अनेकदा एखाद्याच्या दिसण्यावरुन किंवा त्याच्या चेहऱ्याकडे पाहून कसं वागायचं हे ठरवलं जातं. ही गोष्ट कायमच मनाला चटका लावून जाते. त्यावेळी आपला अभिनय लोकांना दिसत नाही का?” असा प्रश्न त्याने यावेळी विचारला.
आणखी वाचा : “…म्हणूनच बाप झाल्यापासून तू वेड्यासारखा वागतोय”, मिनाक्षी राठोडने पतीसाठी केलेली पोस्ट चर्चेत
“एखाद्या मालिकेत किंवा चित्रपटात काम देताना काही लोक तु्म्हाला विविध नजरेतून पाहतात. मी भाषेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमची भाषा समोरच्या व्यक्तीला तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही तुमचं तोंड उघडता. पण जेव्हा तोंड उघडण्याआधी तुम्हाला जज केलं जातं, तेव्हा त्याचं काय करायचं? मला तर पाहिल्याबरोबरच माझी एखाद्या श्रेणीत विभागणी केली जाते. हा कोणत्या तरी एका विशिष्ट जात, समूहाचा असणार किंवा हा गावाकडचा असणार आहे. याचाच अर्थ याला काहीच येत नसणारं. त्यानंतर मात्र तुम्हाला ट्रीट करणं सुरु होतं.”
“मला तर अनेकदा माझ्या दिसण्यावरुन बोललं गेलं. मी काही बोलण्यापूर्वी माझ्याबद्दल मत बनवण्यात आलं. पण याच परिस्थितीने मला तितक्यात हिंमतीने तोंड द्यायला शिकवलं. आता माझा अभिनय पाहिला की सर्वजण शांत होतात”, असेही त्याने सांगितले.
आणखी वाचा : “हो आम्ही…”, ‘तान्हाजी’ चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा अभिनेता होणार बाबा
दरम्यान कैलासने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि नाटकात काम केले आहे. भिरकीट, हाफ तिकीट, भिकारी, मनातल्या उन्हात, ड्राय डे, खिसा, सायकल, मयत, भाऊ, हिरवी अशा चित्रपटातून त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. तानाजी या बॉलिवूड चित्रपटाने कैलासला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. आता लवकरच त्याचा ‘गाभ’ मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. येत्या मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.