शिवसेनेचे दिवंगत नेते व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट चांगलाच गाजला. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दाते यांनी साकारली होती. या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, झी स्टुडिओचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलकर, अभिनेता प्रसाद ओक आणि क्षितिश दाते यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधत आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला.

‘धर्मवीर’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या निर्मितीमागची भूमिका दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी विस्ताराने सांगितली. ‘धर्मवीर आनंद दिघेंचे आयुष्य एका चित्रपटात मावणारे नाही. त्यामुळे पहिल्या भागात त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या आयुष्यभरातील ठळक घडामोडी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. उदा. त्यांचे बालपण, त्यांचे तारुण्य, त्यांचे काम आणि त्यांचा झालेला अपघात. परंतु एवढ्यावरच हे कथानक संपत नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सांगायलाच हव्यात अशा काही राहिलेल्या घटना ‘धर्मवीर २’या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे’ असे प्रवीण तरडे यांनी सांगितले.

Milind Gawali And Teja Devkar
पैसे संपले, अभिनेत्रीला कल्पना न देता निर्माते झाले पसार; नेमकं काय घडलेलं? मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
love lagna locha new marathi movie
‘Love लग्न लोचा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी, प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी…
Guddi Maruti reveals shocking details about Divya Bharti death
“तोंड रक्ताने माखलेली एक…”, दिव्या भारतीच्या निधनाबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा; तिला पडताना ‘या’ व्यक्तीने पाहिल्याचा केला दावा

हेही वाचा >>> ‘घरत गणपती’ ;नात्यांना जोडणारी सुरेख गोष्ट

दोन चित्रपट, एकच व्यक्तिरेखा…

एखादी चरित्र भूमिका साकारणं हेच मुळात कलाकारासाठी आव्हान असतं. इथे तर ‘धर्मवीर’च्या दोन्ही भागांत दोन वेळा आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक, क्षितिश दाते यांनी केली आहे. याबद्दलचा अनुभव सांगताना, एकाच व्यक्तीची दोन वेळा भूमिका करणं ही रंजक गोष्ट आहेच, पण माझ्यासाठी केवळ हयातच नव्हे तर, सध्या सतत कार्यरत असलेल्या आणि माध्यमांसमोर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणं ही आणखी अवघड गोष्ट होती, असं क्षितिश दाते याने सांगितलं. एक नट म्हणून माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे. पण चरित्र भूमिका यशस्वीपणे साकारण्यामागे केवळ तो नटच नव्हे तर त्याच्याबरोबर काम करणारे वेशभूषाकार, रंगभूषाकार हेही मोलाची कामगिरी करतात, असं क्षितिशने सांगितलं. शिवाय, पहिल्यांदा आपण जेव्हा कोणाची चरित्र भूमिका करतो तेव्हा आपण काहीसे चाचपडत असतो. दुसऱ्यांदा त्याच व्यक्तीची भूमिका करण्याचा अनुभव हा कुठेतरी नटालाही परिपक्व करतो, असंही त्याने स्पष्ट केलं.

एकाच चरित्रपटात दोनदा काम करण्याचं भाग्य चरित्रपटात दोनदा एकच भूमिका साकारण्याची संधी फारशी कोणाला मिळत नाही, ती या चित्रपटाच्या निमित्ताने मला आणि क्षितिशला मिळाली. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. पहिला चित्रपट लोकांना प्रचंड आवडल्यानंतर तिथेच न थांबता दुसरा चित्रपट करायचा ठरवलं आणि पहिल्या भागात राहिलेल्या त्रुटी दुसऱ्या भागात भरून काढण्याचा प्रयत्न केला, असं अभिनेता प्रसाद ओक याने सांगितलं. प्रत्येक भूमिका साकारण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा असतो. या चित्रपटाच्या निमित्ताने दिघे साहेबांबद्दल मला जाणून घेण्याची संधी मिळाली, त्यामुळे खूप समाधान वाटतं, अशी भावनाही प्रसादने व्यक्त केली.

‘धर्मवीर २’ हिंदीतही प्रदर्शित करणार ‘धर्मवीर २’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांत प्रदर्शित होणार आहे. ‘धर्मवीर’ प्रदर्शित झाल्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ अशा राज्यांतून हा चित्रपट तिथेही लावण्याची मागणी सुरू झाली होती, पण त्यावेळी हा चित्रपट मराठी भाषेत होता. तरीही, तिथे हा चित्रपट लावलाच पाहिजे अशी त्यांची मागणी होती. या मागणीमागच्या काही गोष्टी नंतर लक्षात आल्या. आनंद दिघे यांच्याबद्दल आदर असणारे अनेकजण तिथे आहेत. उत्तर प्रदेशमधील एका कॉलनीला तर धर्मवीर आनंद दिघे असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे यावेळी ‘धर्मवीर २’ हा चित्रपट मराठीबरोबरच हिंदी भाषेतही प्रदर्शित करायचा निर्णय घेतला, असं मंगेश देसाई यांनी स्पष्ट केलं.

चिठ्ठीतून समाजकार्य…

आनंद दिघेंना मिळालेल्या लोकप्रियतेमागे त्यांची कामाची पद्धत, जनसामान्यांशी स्वत:ला जोडून घेण्याचा आग्रह कारणीभूत होता. त्याबद्दलचे किस्से प्रवीण तरडे यांनी यावेळी सांगितले. ‘आनंद दिघे यांना रस्त्याने जाताना भेटणारे अनेकजण हातात चिठ्ठी द्यायचे. सत्यनारायणाची पूजा, बारसं, दहावं अशा कसल्या कसल्या गोष्टींचं निमंत्रण, ते देणाऱ्याचं नाव आणि पत्ता असलेल्या या चिठ्ठ्या ते खिशात टाकायचे. रात्री घरी गेल्यावर ते आपल्या खिशातील सर्व चिठ्ठ्या बाहेर काढत. त्यांच्या घरी असलेली दोन माणसं त्या चिठ्ठ्या उघडून त्यांच्यावर असलेल्या कार्यक्रमानुसार त्यांच्या दिवसाचे नियोजन करत असत. चिठ्ठी देणारी व्यक्ती आपल्या ओळखीची आहे की नाही याचा विचारही न करता आपल्याला निमंत्रण दिलं आहे मग गेलंच पाहिजे म्हणत दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत ते प्रत्येकाच्या कार्यात सहभागी होत असत. या भेटीगाठीतूनच त्या त्या भागात जाण्यासाठीचे रस्ते, तेथील सांडपाण्याची योजना, कचरा व्यवस्थापन याबद्दलच्या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी आणि जाणीव त्यांना होत असे’ अशी आठवण सांगत दिघे यांच्या वेगळ्या कार्यपद्धतीची माहिती तरडे यांनी दिली.

आनंद दिघे यांच्या विचारांवर भर

‘धर्मवीर’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा दिघेंविषयी नव्या पिढीला फारशी माहिती नव्हती, पण आज ठाणे, मुंबई, पालघर, कल्याण, नाशिक या भागांत त्यांचे फार मोठे काम असल्याने त्यांचे नाव सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. पहिल्या चित्रपटातून त्यांच्याविषयी पूर्ण माहिती झाल्यानंतर दुसऱ्या भागात ते संपूर्ण आयुष्य कुठल्या विचारांची बैठक, तत्त्व बाळगत जगले हे आम्हाला मांडायचं होतं. त्यामुळे या भागात कुठल्याही धर्माशी न जोडलेला त्यांचा हिंदुत्ववादाचा विचार आणि तो वारसा पुढे घेऊन जाणारे त्यांचे अनुयायी यांची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केले.

दिघेंचा चरित्रपट साकारणे हे आव्हान…

आनंद दिघेंवर चरित्रपट करण्याचे स्वप्न अभिनेता, निर्माता मंगेश देसाई यांनी पाहिले होते. पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीपासूनचा प्रवास त्यांनी उलगडला. ‘२०१३ सालापासून मला आनंद दिघे यांचा चरित्रपट करायचा विचार डोक्यात घोळत होता. धर्मवीर आनंद दिघेंचं चरित्र चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणं हे एक आव्हानच होतं. त्यासाठी खूप अभ्यास केला, खूप लोकांच्या भेटीगाठी, संदर्भ पडताळून पाहिले गेले. शिवाय, हा चित्रपट किंवा त्यांची कथा पडद्यावर पाहताना ती खरी वाटणंही तितकंच महत्त्वाचं होतं. त्यामुळे या चित्रपटाची प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक करण्यात आली आहे’, असं मंगेश देसाई यांनी सांगितलं.