मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. आज तेजश्रीचा ३५ वा वाढदिवस आहे. आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. पण आपल्या कामाने प्रेक्षकांची नेहमीच वाहवा मिळवणाऱ्या तेजश्रीचं शिक्षण किती हे माहीत आहे? चला जाणून घेऊ या.
‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर त्यानंतर ‘तुझं नि माझं घर श्रीमंताचं’ या मालिकेमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. याचबरोबर ती अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘झेंडा’ या चित्रपटामध्येही झळकली. पण ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने तिला नवी ओळख दिली आणि ती प्रेक्षकांच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनली. पण अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या आधी तेजश्री बँकेत काम करत होती.
आणखी वाचा : “आयुष्यातील सर्वात कठीण काळ…” तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत
जश्री मूळची डोंबिवलीची आहे. डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयामध्ये तिने शालेय शिक्षण घेतलं. तेजश्रीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तिने NIITचा एक कोर्स केला. तिला कौन्सिलर व्हायचं होतं. तिला सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट होता. तिने चौदावीपर्यंत सायकॉलॉजी हा विषय घेऊन शिक्षण घेतलं. पण त्याच वेळी तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.
तेव्हा शूटिंगमुळे तिला अभ्यासाला जास्त वेळ देता येत नव्हता. त्यामुळे तिने सायकॉलॉजीचं शिक्षण सोडलं आणि अभिनय करण्याला प्राधान्य दिलं. तिने मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयातून पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये पदवी मिळवली. याचबरोबर जर्मन भाषेची आवड असल्याने ती जर्मन भाषाही शिकली. तिने त्या भाषेच्या तीन लेव्हल पूर्ण केल्या आहेत.