Tejashri Pradhan : महाराष्ट्रात राहून मराठी सिनेमांना स्क्रिन्स मिळत नाहीये याबद्दलची खंत गेल्या काही वर्षांपासून अनेक मराठी कलाकार जाहीर व्यक्त करत आहेत. बॉलीवूड सिनेमांना प्राइम टाइम दिला जातो पण, मराठी सिनेमांना ना प्राइम टाइम, ना थिएटरमध्ये स्क्रिन्स काहीच मिळत नाही; अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. याबद्दल यापूर्वी मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी जाहीरपणे आपली मतं मांडली आहेत. आता याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री तेजश्री प्रधानने लक्षवेधी पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
नुकताच तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाला प्रदर्शित झाल्यापासून थिएटरमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याच्या पोस्ट कलाकार देखील शेअर करत आहेत. मात्र, तेजश्रीने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपटाचे शोज हाऊसफुल असूनही थिएटर मिळत नसल्याचं तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हटलं आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधानची पोस्ट
महाराष्ट्रात आपल्या मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही याबद्दल तिने खंत व्यक्त केली आहे. “हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा आमचा सिनेमा हाऊसफुल आहे पुणे आणि मुंबईमध्ये…( मिळालेल्या मोजक्या सिनेमागृहांमध्ये ) पण, महाराष्ट्रात मराठी सिनेमासाठी थिएटर्स उपलब्ध नाहीत हे दुर्दैवी आहे.” असं तेजश्रीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तेजश्री व सुबोध भावे यांच्या चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत या कलाकारांच्या सुद्धा यामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. २० डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यापासून काही हाऊसफुल शोला तेजश्री आणि सुबोध यांनी स्वत: थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांची भेट घेतली होती. त्यामुळे लोकाश्रय मिळणाऱ्या या चित्रपटाला आणखी शोज मिळायला हवेत असं अभिनेत्रीने ( Tejashri Pradhan ) तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा : हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
दरम्यान, ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आनंद गोखले सांगतात, “आजच्या काळात लग्न करताना जोडीदार ज्या गोष्टी एकमेकांमध्ये पाहतो त्या गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. लग्न करताना आता तरुणांची विचारसरणी बदलली आहे, त्यांचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा झाला आहे. हा सिनेमा तरुणांना विशेष जवळचा वाटेल. असे असले तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे.”