मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी तेजस्विनी फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. याचबरोबर ती सामाजिक व राजकीय विषयांवर तिची मतं मांडत असते. ती अनेकदा राजकीय परिस्थितीवरही भाष्य करत असते. आता तिने एक्सवर केलेल्या एक पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.
“जनता मूर्ख नाही. सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे!” अशी पोस्ट तेजस्विनी पंडितने केली आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहे. तेजस्विनीने पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नाही. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
‘जनता मूर्ख नाही पण मूर्ख बनवलं जातंय,’ ‘म्हणूनच जनतेने कधी तुमच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांना कधी साथ दिली नाही!’, ‘बरोबर. २०१९ ची निवडणूक आणि मतदान लक्षात आहे लोकांच्या!’, ‘जनता मोठ्या प्रमाणात यांच्या विरोधात आहे. फक्त काही गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते यांच्या जवळ आहेत,’ अशा कमेंट्स यावर लोकांनी केल्या आहेत.
दरम्यान, तेजस्विनी पंडितने या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही. पण कमेंट्स पाहता ही पोस्ट सध्याच्या राजकीय परिस्थितीवर असल्याचं दिसतंय. निवडणूक आयोगाने अजित पवार गटच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर तेजस्विनीने ही पोस्ट केल्याचं दिसतंय, पण तिने मात्र याबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही.