मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात, मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपट पाहत नाही, मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाही, असे अलीकडे अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शकांकडून ऐकायला मिळते. आता अभिनेत्री तेजस्विनी पंडीत(Tejaswini Pandit)ने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे. तेजस्विनी पंडीत ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘तू ही रे’, ‘रोशन व्हिला’, ‘ये रे ये रे पैसा’, अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखली जाते. याबरोबरच अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचे दिसते. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत मराठी भाषेविषयी केलेले वक्तव्य चर्चेत असल्याचे दिसत आहे.
आपले प्रेक्षक आपल्याबरोबर…
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मुक्काम पोस्ट मनोरंजन या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीची परिस्थिती सध्या चांगली नाहीये, लोक सिनेमा बघायला येत नाहीत, जे पैसे घालतात, त्यांचे पैसे बुडत आहेत अशी सध्या मराठी सिनेसृष्टीची स्थिती असल्याचे म्हटले जात आहे. एक निर्माती म्हणून तुझ्यामते यामध्ये कितपत तथ्य आहे? यावर बोलताना तेजस्विनी पंडित म्हणाली, “बऱ्यापैकी तथ्य आहे, या विषयावर खूप लोक खूप मतं मांडतात. आता मी ज्या लोकांशी बोलते, त्यापैकी काहींचं असं म्हणणं आहे की, आपले प्रेक्षक आपल्याबरोबर प्रामाणिक नाहीयेत, पण हे वादग्रस्त आहे. दुसरी बाजू अशी आहे की, हल्ली लोकांना सिनेमा बघणं परवडत नाहीये. तिसरी बाजू अशी आहे की ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे लोकांना ओटीटीवर सिनेमा आल्यानंतरच सिनेमा बघायचा आहे. चौथी बाजू अशी की, लोक म्हणत आहेत की साऊथवाले आता इथे येऊन इतके गाजवतात की मग बाकीचे सिनेमे बघावेसे वाटत नाहीत. या चारही गोष्टींनी दुसरी बाजू भरलेली आहे.”
“खूप जण अशी तक्रार करतात की, तुम्ही साऊथसारखे चित्रपट का बनवत नाही; तर साऊथमध्ये १०० सिनेमे बनत असतील, त्यातले फार तर दोन किंवा तीन सिनेमे आपल्याकडे येतात. तिथे गाजलेले असतात ते इथे गाजतात. आपल्याला माहीत नाही की १०० पैकी ९७ सिनेमे कदाचित चाललेसुद्धा नसतील. आपण बघताना बघतो की अमुक अमुक तीन सिनेमे चालले, कारण आपल्याकडे एवढे तीन चालणारेदेखील सिनेमे नाहीयेत; तर त्यांचं ते यश आपल्याला यश वाटतं. तर अशी ही दुसरी बाजू सांगण्याचा प्रयत्न करते की असंही असू शकतं.
“भाषेविषयी आपली मोठी समस्या ही आहे की महाराष्ट्रात मराठीबरोबर हिंदीचासुद्धा तितकाच प्रभाव आहे. म्हणजे आपण कितीही मराठी-मराठी असं म्हटलं तरी मराठी प्रेक्षक मराठी सिनेमाला खूप कमी प्राधान्य देतो, म्हणजे १०० पैकी २० टक्के प्रेक्षक फक्त असा असेल जो मराठी सिनेमांना प्राधान्य देतो. बाकी ८० टक्के लोक हे हिंदी सिनेमांनाच प्राधान्य देतात. त्याच कारणसुद्धा आहे. उदाहरणार्थ, मी एक तानाजी नावाचा मराठी चित्रपट काढला आणि हिंदीवाल्यांनीसुद्धा काढला; तर सहाजिकपणे हिंदीमध्ये बजेट जास्त असल्यामुळे पहिला तानाजी चित्रपट प्रेक्षक कुठला पाहतील तर तुम्ही हिंदीमधील पाहतील. मग त्याच्या तुलनेत असं वाटेल की मराठी चित्रपट खूप बोअर केला आहे. मराठी अगदीच सुमार केला आहे. ”
तेजस्विनी पंडित पुढे म्हणाली, ” आपल्याला भाषेचे वर्चस्व हवं आहे का? तर निश्चितपणे हवं आहे. एकंदरीतच मला असं वाटतं की, मराठी मरतानाच दिसत आहे. आपण ती जगवणं हे आपलं काम आहे. पिढी म्हणून आपलं काम आहे. पुढच्या पिढीमध्ये आपण मराठी भाषा पोहोचवली पाहिजे. पुढची पिढी ती कितपत सांभाळू शकेल हे आपल्याला माहिती नाही. मला वाटतं की भाषेचा अभिमान आणि भाषेला प्राधान्य हे आपल्यापैकी प्रत्येकाने केले पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे; तर मग आपण मराठी भाषेला पुढे नेलं पाहिजे. ती भाषा कुठेही आली असली तरी म्हणजे नोकरी असेल तर तिथे ८० टक्के लोक हे मराठी असलेच पाहिजेत. मी हे खूप मोठ्या पातळीवर बोलत आहे, पण तरीही ६५ टक्के लोकांना तरी महाराष्ट्रात हक्क मिळाले पाहिजेत.”