‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘तू ही रे’ अशा दमदार चित्रपटांमध्ये काम करणारी मराठी चित्रपसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला घराघरांत ओळखलं जातं. मराठीसह तिने बॉलीवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात तिने शूर्पणखाचं पात्र साकारलं होतं. अभिनयाशिवाय अनेक सामाजिक विषयांवर तेजस्विनी स्पष्टपणे आपलं मत मांडताना दिसते. नवरात्रीनिमित्त लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनीने मनोरंजनसृष्टीतील गटबाजी, राजकारण, ट्रोलिंग याबाबत तिचे परखड विचार मांडले.
हेही वाचा : विराट कोहलीचं शतक ५ धावांनी हुकल्यावर पत्नी अनुष्का शर्माने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ, म्हणाली…
मराठी अभिनेत्रींनी बिकिनी घातल्यावर किंवा बिकिनीमधील फोटो शेअर केलेल्या त्यांना मराठी अस्मितेवरून ट्रोल केलं जातं यावर आपलं मत मांडताना तेजस्विनी म्हणाली, “सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनवर आता पैसे आकारले पाहिजेत असं मला वाटतं. प्रत्येक कमेंटसाठी कमीत कमी दहा रुपये जरी आकारले तरीही, लोक असले प्रकार करणार नाहीत आणि कमेंट्सचं एकंदरीत स्वरुप बदलेल.”
तेजस्विनी पुढे म्हणाली, “जर माझं शरीर चांगलं आहे…मला एखादे कपडे आवडतात आणि ते मी घातले यात काहीच गैर नाहीये. बरं स्विमिंग पूलमध्ये बिकिनी नाही घालणार, तर कुठे घालणार? त्यामुळे तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगायचंय? की, लोकांना काय वाटतं म्हणून जगायचंय हे तुमचं तुम्हाला ठरवावं लागेल.”
“स्वत:च्या मताप्रमाणे जगायचं ठरवलं की, बिकिनी घालून फोटो टाकल्यावर खालच्या कमेंट्स वाचायच्या नाहीत. त्या फोटोंवरुन कोणी ट्रोल केलं तरीही फरक पडता कामा नये. जर अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला जमत नसेल, तर लोकांना हवं तसं वागावं लागतं. माझ्या अनेक मैत्रिणींनी मुलं होऊ द्यायची नाहीत असा निर्णय घेतला आहे. यावर अनेक लोकांनी खूपच वाईट कमेंट्स केल्या होत्या. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलणं ही सोशल मीडियावरची खूप मोठी समस्या आहे.” असं मत तेजस्विनी पंडितने व्यक्त केलं.