मराठी चित्रपटसृष्टीत काही अजरामर चित्रपट होऊन गेले. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’, उत्कृष्ट कथा, संवाद, गाणी आणि कलाकरांच्या अभिनयामुळे हा चित्रपट चांगलाच गाजला. चित्रपट प्रदर्शित होऊन कित्येक वर्ष झाले असले तरी अजूनही तेवढ्याच आवडीने हा चित्रपट बघितला जातो. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाचा दुसरा भाग यावा अशी इच्छाही व्यक्त केली. नुकतंच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या चित्रपटाच्या रिमेकबाबत मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा- “नग्न झाल्यावर चित्रपटात काम मिळतं का?” विचारणाऱ्याला मिताली मयेकरचे सडेतोड उत्तर; म्हणाली, “बघा…”
अलीकडेच तेजस्विनीने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तेजस्विनीने करिअरबरोबरच अनेक वैयक्तिक घडामोडींचा उलगडा केला आहे. दरम्यान, ‘अशी ही बनवाबनवी’चा रिमेक बनला तर अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या भूमिकेत कोणत्या कलाकाराला बघायला आवडेल, याबाबत तेजस्विनीने सांगितले आहे.
तेजस्विनी म्हणाली, ‘अशी ही बनवाबनवी’चा रिमेक मी बनवला तर सचिन पिळगावकरांच्या भूमिकेसाठी मी सिद्धार्थ चांदेकरला कास्ट करेन, कारण त्या चित्रपटात सचिन सर स्त्री वेशात इतके गोड दिसले आहेत. सिद्धार्थ चिकना आहे. तो स्त्री वेशात खूप गोड दिसेल. त्या पात्रात तो खूप छान दिसेल असं मला वाटतं. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या भूमिकेसाठी मी अभिनयलाच कास्ट करेन. तो ते खूप छान पद्धतीने वटवू शकेल. अशोक सराफ यांच्या भूमिकेसाठी मी अमेय वाघला कास्ट करेन.”
हेही वाचा- “…म्हणून तुझा घसा दुखतोय”, अभिज्ञा भावेच्या ‘त्या’ फोटोवर नवऱ्याने केलेल्या खास कमेंटने वेधलं लक्ष
तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत तिने अनेक मराठी सुपरहिट चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. ‘तू ही रे’, ‘येरे येरे पैसा’, ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटांतील तिच्या भूमिकेचं सगळीकडे कौतुक झालं. आता लवकरच तिचा ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रसाद खांडेकर करत आहेत. अभिनयाबरोबर नुकतचं तेजस्विनीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.