करोनानंतर मराठी सिनेसृष्टीत अनेक विषयांवर विविध धाटणीच्या चित्रपटाची निर्मिती सुरु आहे. आतापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाले आहे. तर काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बेभान’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीझर लाँच झाला. अवघा महाराष्ट्रच भगव्याला विसरायला लागलाय..! या डायलॉगमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. भगवा कोणाचा? धनुष्यबाण कोणाचा ? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच आता शशिकांत पवार प्रोडक्शन प्रस्तुत आगामी ‘बेभान’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘भगव्याला महाराष्ट्र विसरला’ असं विधान या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चित्रपटाविषयी नवे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
आणखी वाचा : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ५ मराठी चित्रपटांची निवड, नावं जाहीर

या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात बाबा, तुमचा भगवा झेंडा लोक विसरलेत या डायलॉगने होते. त्यावर समोर असणारी एक वयोवृद्ध व्यक्ती म्हणते अरं माझं काय घेऊन बसलास, या भगव्याला अख्खा महाराष्ट्राचं विसरायला लागलाय?? सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता या चित्रपटातील एक सामान्य नागरिक हे विधान करतो ते नक्की कोणाच्या बाजूने आहे? कोण विसरला आहे भगव्याला? हा चित्रपट सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर आहे का? उद्या भविष्यात या चित्रपटावर बंदी येणार का? असे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही

आणखी वाचा : मुख्यमंत्री पदासाठी आखलेले कारस्थान अन् उद्धवस्त झालेले कुटुंब, ‘चाणक्य’ चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा

बेभान” हा चित्रपट दिनेश देशपांडे यांच्या कथेवर आधारित आहे. दिग्दर्शक अनुप जगदाळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. मंगेश कांगणे यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली असून ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केलं आहे.

आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ठाकूर अनुप सिंग हा मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. अनुप सिंगनं बॉडी बिल्डिंगची मिस्टर वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली होती. ठाकूर अनुपसिंग याच्याबरोबर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत. येत्या ११ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.