‘अथांग’ या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली आणि काही प्रश्न विचारले. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी मराठी चित्रपट आणि वेब सीरिजमधील प्रयोग, वेबसीरिजवरील सेन्सॉरशिप, त्यांचं मराठीवरचं प्रेम आणि त्यांच्या आवडत्या वेब सीरिजबदद्ल भाष्य केलं.
सरुवातीला राज ठाकरे म्हणाले, “मी सीरिजवाला माणूस नाही. मी फिल्मवाला माणूस आहे. २-३ तासांत जे काही सांगायचं ते सांगून द्या. पण आतापर्यंत मी २-४ सीरिज आतापर्यंत पाहिल्या आहेत. ‘अथांग’ सीरिजही बघणार आहे. पण मी अलीकडेच एक वेब सीरिज पाहिली. खरं तर वेब सीरिज परत पाहावी, असं वाटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी नुकतीच ‘द ऑफर’ नावाची एक वेब सीरिज पाहिली आणि ती मला पुन्हा पाहावी, असं वाटतंय. ही ९-१० भागांची सीरिज आहे. ही सीरिज वूटवरती आहे. मी गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलेली ही उत्तम पीरियड सीरिज आहे. त्यामध्ये ज्याप्रकारे त्यांनी पीरियड मेंटेन केला, ते विलक्षण आहे. पण त्यासाठी त्यांच्याजवळ जी साधनं आहेत, ती आपल्याकडे नाहीत,” असं राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचाी – “…म्हणून मी कट्टर मराठी आहे”; राज ठाकरेंनी सांगितलं कारण
पुढे मराठी चित्रपटांसाठी भूमिका घेण्याबद्दलही त्यांनी मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “खरं तर मी एकटाच मराठी माणसाच्या पाठीमागे उभा आहे, असं नाही. इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने काम करतो. माझ्या घरात मला आजोबा, वडील किंवा काकांपासून जे संस्कार मिळाले, त्यामुळे मी अत्यंत हार्डकोअर, कट्टर मराठी आहे. त्यामुळे मला जिथे शक्य असतं तिथे तिथे मी मराठी माणसांसाठी उभा राहतो. मी कोणावरही उपकार करत नाही. मला शक्य असेल तितकं माझं कर्तव्य पार पडण्याचा प्रयत्न करतो,” असं राज ठाकरे म्हणाले.