मराठी सिनेसृष्टीला अनेक उत्कृष्ट कलाकार मिळाले; ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. विविधांगी भूमिका साकारून स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं. यापैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेत विजय चव्हाण. विजय चव्हाण यांनी नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात आपलं भक्कम स्थान निर्माण केलं होतं. या तिन्ही क्षेत्रात त्यांनी केलेली काम चांगलीच गाजली. ‘मोरूची मावशी’ या गाजलेल्या नाटकातील त्यांनी साकारलेली मावशी आजतागायत अजरामर आहे. विजय चव्हाणांना आपल्यातून जाऊन जवळपास ६ वर्षे झाली आहेत. तरी त्यांच्या आठवणी मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत.
विजय चव्हाण यांच्या पत्नी विभावरी चव्हाण या देखील एक उत्तम अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक नाटकं केली होती. ‘मोरूची मावशी’ या नाटकात देखील विभावरी चव्हाण यांनी विजय चव्हाणांबरोबर काम केलं होतं. पण त्यांनी लग्न झाल्यानंतर अभिनय क्षेत्र सोडलं. यामागचं कारण त्यांनी अलीकडे अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.
हेही वाचा – निळू फुलेंचं बालपण, शालेय शिक्षण अन् राष्ट्र सेवा दलाशी कसा आला संबंध? जाणून घ्या…
विभावरी चव्हाण म्हणाल्या, “वरद झाल्यानंतर मी अभिनय क्षेत्र सोडलं. कारण विजय यांना फार इच्छा नव्हती की बायकोने काम करावं. त्यांचं म्हणणं होतं की, दोघं-दोघं घराबाहेर नको. तसं आताच्या काळात जास्त मोकळं वातावरण झालंय. म्हणजे मी लालबागला असताना चक्क २४ तास साडी नेसायचे. तेव्हा आमचं एकत्र कुटुंब होतं. आता खूप बदललंय. एकमेकांना स्वतःचा वेळ दिला जातो. आर्थिक दृष्ट्या लोकांना आता परवडत नाही एका चाकावर संसार चालवणं. पण त्यावेळेस मी विजय यांचं म्हणणं ऐकून म्हटलं, ठीक आहे आणि मी अभिनय क्षेत्र सोडलं.”
लोकप्रिय मालिका, चित्रपटाला दिला नकार
पुढे विजय चव्हाणांच्या पत्नी म्हणाल्या, “वरद लहान असताना खूप गोड मुलगा होता. त्याचा विशेष त्रास नव्हता. फक्त मी त्याला आजूबाजूला पाहिजे असायची. मला एका दोनदा विचारणा झाली होती. ‘बंदिनी’ मालिका होती. तेव्हा वरद अगदीच आठ दिवसांचा होता मी नुकतीच बाळंतीण झाली होते. मी त्याच रात्री घरी आले आणि मला फोन आला शांताराम नांदगावकर यांचा की, तुझ्यासाठी ‘बंदिनी’ मालिकेत एक भूमिका आहे. मला खूप वेगळंच वाटतं होतं, कारण ती मालिका चालली. तेव्हा संपूर्ण स्त्री प्रधान व्यक्तिमत्त्व असायची. बायकांभोवती गोष्ट असायची. पण म्हणतात ना, एखादी गोष्ट नाही करायची ठरवलं. तर त्यातून माणूस अलिप्त होतं जातो. तसंच माझं झालं. आता जरी मला येऊन सांगितलं आईची भूमिका कर तर माझे पाय पण हलणार नाहीत. आता मी घरीच आनंदी आहे.”
त्यानंतर विभावरी चव्हाण यांना विचारलं केलं, ‘चित्रपटातही काम करणार नाही?’ यावर त्या म्हणाल्या, “नाही. ‘पुढचं पाऊल’ चित्रपटासाठी प्रशांतने विचारलं होतं. मला मधुसूदन कालेलकर यांनी सांगितलं होतं तू नाटकात काम कर पण सिनेमात नको. त्यांचे ते शब्द कानात बसले त्यामुळे नको बाबा चित्रपटात काम, असं झालं. पण ते चुकीचं होतं, हे आता कळतंय. कारण तो चित्रपट चालला. पण आता माझं आजी-नातीचं मस्त चाललंय.”