अलीकडच्या काळात बरेच कलाकार आपल्या समस्यांविषयी सोशल मीडियावर मनमोकळेपणाने संवाद साधतात. वैयक्तिक आयुष्यातील सुख-दु:ख चाहत्यांना सांगतात. सध्या मराठी मनोरंजन विश्वातील अशाच एका अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे कृतिका गायकवाड. ती ‘टाईमपास ३’ चित्रपटामध्ये एका गाण्यात झळकली होती. कृतिकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचं पोट फुगल्याचं दिसत आहे. मात्र, ती गरोदर नाही. आता अभिनेत्रीला नेमकं काय झालंय याचा खुलासा तिने पोस्ट शेअर करत केला आहे.
कृतिकाने पोस्ट शेअर करत तिला नेमका काय आजार झालाय याबद्दल सांगत आरोग्य चाचणी करणं किती महत्त्वाचं आहे याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. कृतिका लिहिते, “मी गरोदर नाही! हे गर्भाशयाचे फायब्रॉइड्स आहेत. हे फायब्रॉइड्स वर्षानुवर्षे विकसित ( मोठे) झाले.” फायब्रॉइड्स म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडणार याचा विचार करूनच कृतिकाने याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
कृतिका पुढे लिहिते, “फायब्रॉइड्स या गर्भाशयात तयार झालेल्या गाठी आहेत. या फायब्रॉइड्सच्या गाठी म्हणजे कर्करोग नाही. फायब्रॉइड असलेल्या सगळ्याच महिलांना या आजाराची सारखी लक्षणं आढळत नाहीत. परंतु, ज्या स्त्रियांना लक्षणं आढळतात त्यांना या फायब्रॉइड्सबरोबर जगणं कठीण वाटतं. काहींना वेदना होतात तर, काही स्त्रियांना मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होतो. काही फायब्रॉइड्सच्या गाठी डोळ्यांनाही दिसणार नाहीत, तर काही द्राक्षासारख्या किंवा त्याहून मोठ्या होतात. फायब्रॉइडमुळे गर्भाशयाच्या बाहेरील आणि आतील भागाला इजा पोहोचते. काही गंभीर केसेसमध्ये गाठी पेल्विस आणि पोटापर्यंत वाढतात. यामुळे तुम्ही गरोदर असल्यासारखं वाटू लागतं.”
“मैत्रिणींनो! वेळीच सावध व्हा…गोष्टी तुमच्या हाताबाहेर जाण्यापूर्वी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून वेळीच व नियमित तपासणी करत राहा” असं कृतिकाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी कमेंट्स करत “काळजी घे, लवकर बरी हो” असा सल्ला तिला दिला आहे. याशिवाय, कृतिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘विठ्ठला शपथ’, ‘धुमस’, ‘बंदीशाळा’ या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.