‘टाईमपास’ चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरांत लोकप्रिय झाला. यामध्ये त्याने साकारलेली ‘दगडू’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘टकाटक’, ‘उर्फी’, ‘बालक पालक’ अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये प्रथमेशने परबने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने मराठीसह बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. परंतु, इंडस्ट्रीत प्रसिद्ध होण्यापूर्वी वैयक्तिक आयुष्यात प्रथमेशने खूप संघर्ष केला आहे. नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने याविषयी सांगितलं आहे.
प्रथमेश परब आपल्या बालपणीच्या आठवणींविषयी सांगतो, “लहानपणी आम्ही भाड्याने महाकाली परिसरात राहायचो. तिथे आमचं अर्ध पत्र्याचं आणि अर्ध भिंतीचं घर होतं. त्या पत्र्याच्या घरातही आम्ही खूप सुखी होतो. आमच्या आजूबाजूला खूप छान-छान माणसं होती. काही दिवसांनी आम्ही थोड्याशा मोठ्या घरात राहायला गेलो. ते घर सुद्धा चाळीतच होतं पण, आमच्या हक्काचं होतं. माझ्या आई-बाबांनी त्या हक्काच्या घरासाठी स्वत: कष्ट केले, दागिने विकले आणि त्यामधून ते घर घेतलं होतं. सुरुवातीला त्यांचे कष्ट दिसायचे नाहीत पण, मी सातवी-आठवीत गेल्यावर विचार करायचो आपले आई-बाबा महिन्याच्या अखेरीस दुसऱ्यांकडून पैसे का आणतात? तेव्हा माझी आई इतरांकडून कधी पाचशे, तर कधी हजार रुपये आणायची. हळुहळू या सगळ्या गोष्टींची जाणीव मला होऊ लागली.”
हेही वाचा : रितेश-जिनिलीयाच्या मुलांचं आजीबरोबर ‘असं’ आहे बॉण्डिंग! देशमुखांच्या सुनेने शेअर केले लातूरमधील Unseen फोटो
प्रथमेश परब पुढे म्हणाला, “मी जिथे राहायचो त्याठिकाणी जवळच असलेल्या किराणा मालाच्या दुकानात जवळपास आमची २० हजार रुपये उधारी होती. पण, त्या दुकानदाराने मला एका शब्दाने कधीही त्याबद्दल विचारलं नाही. आता त्यांच्या दुकानात गेल्यावर ते मला त्याच प्रेमाने चॉकलेट वगैरे देतात. ही सगळी माझ्या आई-बाबांची पुण्याई आहे. तुमच्याकडे पैसा कमी असला तरीही चालेल पण, माणुसकी सोडून चालणार नाही. चाळीत मी याच सगळ्या माणसांच्या सानिध्यात घडलो. आमची सकाळ ही नळावरची भांडणं ऐकून व्हायची. त्या सगळ्या गोष्टींमध्ये वेगळाच आनंद होता आजही ते सगळं मला आठवतं. ‘टाईमपास’नंतर देखील मी चाळीत राहत होतो.”
हेही वाचा : “तिचा संघर्ष…”, मराठी अभिनेत्रीची अंकिता लोखंडेसाठी पोस्ट, ‘पवित्र रिश्ता’मध्ये केलंय एकत्र काम, कोण आहे ती?
“माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी हळुहळू बदलत गेल्या. आज जे काही मिळालंय त्यासाठी मी खरंच खूप जास्त आनंदी व समाधानी आहे.” असं अभिनेत्याने सांगितलं. दरम्यान, वैयक्तिक आयुष्यात प्रथमेश लवकरच क्षितिजा घोसाळकरबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.