‘टाइमपास’ या चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परबला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील ‘दगडू’ हा घराघरात पोहोचला. कोवळ्या वयातील प्रेमकहाणीचा हीरो म्हणून दगडूला तेव्हा लोकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं. त्याचे कित्येक डायलॉग आजही लोकांच्या ओठांवर आहेत. या चित्रपटाची लोकप्रियता पाहून दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाचे पुढचे २ भाग काढले आणि त्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टकाटक २’ आणि ‘टाइमपास ३’ यामुळे प्रथमेश पुन्हा चर्चेत आला. याबरोबरच तो सोशल मिडियावरही चांगलाच सक्रिय असतो. पण सध्या प्रथमेश वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. दगडूला त्याची खरी प्राजू मिळाली आहे का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. दिवाळीनिमित्त प्रथमेशने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर काही फोटोज शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टची आणि फोटोंची चांगलीच चर्चा रंगली आहे.
प्रथमेशने अभिनेत्री क्षितिजा घोसाळकर हिच्याबरोबर दिवाळी साजरी करतानाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दोघेही पारंपरिक वेशभुषेत आपल्याला दिसत असून दोघांच्या नात्याबद्दल सध्या चांगलीच चर्चा होत आहे. याआधीसुद्धा प्रथमेशने क्षितिजाबरोबर फोटोशूट केलं आहे. पण हे फोटोशूट थोडं हटके असल्याने चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारून भंडावून सोडलं आहे. शिवाय “निमित्त जरी दिवाळीचं असलं तरीदेखील नात्यांचं साजरं होणं महत्वाचं!” असं प्रथमेशने या पोस्टमध्ये लिहिलं असल्याने या चर्चेला उधाण आलं आहे.
प्रथमेश आणि क्षितिजाचं हे फोटोशूट पाहून कित्येक लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तर काही लोकांनी “दादुस, आमची वहिनी का?” असा प्रश्नही विचारला आहे. याबाबत प्रथमेश किंवा क्षितिजा यांनी अजूनतरी स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण ही पोस्ट पाहून प्राजूच्या प्रेमात वेडा झालेल्या दगडूच्या आयुष्यात खरी प्राजू आलीये का हा प्रश्न त्याला चाहते सातत्याने विचारत आहे. क्षितिजा घोसाळकर एक मॉडेल आहे जीने ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं होतं.