‘बालक पालक’, ‘नटरंग’, ‘टाइमपास’, ‘न्यूड’, ‘रंपाट’, ‘बालगंधर्व’ अशा बऱ्याच दर्जेदार कलाकृती मराठी सिनेसृष्टीला दिलेल्या रवी जाधव यांची २०२५ या नवीन वर्षाची सुरुवात खूपच खास झाली आहे. रवी जाधव यांनी नवीन वर्षात नवं आलिशान घर घेतल्याचं समोर आलं आहे. ही आनंदाची बातमी त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. नव्या घराच्या वास्तुशांतीचा व्हिडीओ त्यांनी नुकताच शेअर केला आहे.
लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांच्या नव्या आलिशान घराची नुकतीच वास्तुशांती पारंपरिक पद्धतीने पार पडली. याचा व्हिडीओ शेअर करत रवी जाधव यांनी लिहिलं की, डोंबिवली बाहेरील दावडी गावातील छोट्याशा घरातून सुरू झालेला आमचा दोघांच्या स्वप्नांचा प्रवास आता इथंवर येऊन पुन्हा नव्याने नवी स्वप्नं पाहायला सज्ज झाला आहे…आमच्या नव्या घराच्या वास्तुशांतीचे हे काही खास क्षण…आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या ही विनंती.
रवी जाधव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांचं आलिशान घर पाहायला मिळत आहे. झाडं आणि आई-वडील, भावंडांच्या फोटोंनी रवी जाधव यांचं नवं घर सजलेलं पाहायला मिळत आहे. मराठी रिती-रिवाजानुसार रवी यांनी आपल्या कुटुंबीयांबरोबर नव्या घरात प्रवेश केला. वास्तुशांतीसाठी रवी यांनी फिकट हिरव्या रंगाचा सदरा, पायजमा घातला होता. तर त्यांची पत्नी मेघना जाधव यांनी हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.
हेही वाचा – Bigg Boss 18: चाहत पांडे कोणाला करतेय डेट? ‘बिग बॉस’मध्ये जाण्याआधी आईला करून दिलेली ओळख
रवी जाधव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘अभिनंदन सर’, ‘खूप छान’, ‘हे किती सुंदर आहे. तुमच्या घरावर आणि कुटुंबावर ईश्वराचे आशीर्वाद सदैव राहो’, ‘खूप खूप अभिनंदन..अजून यश प्राप्त होवो’, ‘सर्वांना अशीच प्रेरणा देत राहा’, अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.
हेही वाचा – अलका कुबल यांनी सांगितली पायलट लेकीबरोबरच्या ‘या’ फोटोमागची गोष्ट, म्हणाल्या, “जेव्हा विमान थांबलं…”
दरम्यान, रवी जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही काम केलं आहे. ‘बँजो’, ‘मै अटल हूं’ या हिंदी चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. तसंच त्यांची ‘ताली’ वेब सीरिज चांगलीच गाजली होती. आता रवी जाधव यांचा ‘बाल शिवाजी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.