अभिनेत्री तितीक्षा तावडे ही मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तितीक्षानं आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने तिची बहीण अभिनेत्री खुशबू तावडेच्या पावलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात पदार्पण केलं आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी तितीक्षा सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. ती अनेकदा तिचे खास फोटो शेअर करीत असते.

अशातच तितीक्षानं नुकतच तिचा नवरा अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह फोटो शेअर करीत एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तितीक्षानं खास सिद्धार्थसाठी केली असून, त्याखाली तिने लिहिलेल्या कॅप्शननं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तितीक्षानं तिचा व सिद्धार्थबरोबरचा फोटो पोस्ट करीत सिद्धार्थला त्याचा नवीन सिनेमा ‘देवमाणूस’साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या पोस्टमध्ये तितीक्षाने लिहिलं आहे, “मला तुझा प्रचंड अभिमान आहे .’देवमाणूस’मधील तुझ्या कामाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तू तुझ्या भूमिकेसाठी पडद्यामागे घेतलेली मेहनत मी पाहिली आहे आणि तुला पडद्यावर पाहिल्यानंतर असं वाटतं की, त्या मेहनतीचं चीज झालं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक भावनेला तू तुझं सर्वस्व दिलं आहेस. तुझा खूप अभिमान वाटतो आणि खूप काही शिकायलाही मिळतं.” पुढे तितीक्षा असं म्हणाली, “तुला दिग्गज कलाकारांसह काम करताना पाहून खूप आनंद होतो. तर पोस्टच्या शेवटी ‘देवमाणूस’ चित्रपट प्रदर्शित झाला असून, लोकांकडून चित्रपटातील तुझ्या कामाबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे.”

‘देवमाणूस’ चित्रपट आज २५ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळते. अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह त्यामध्ये अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री रेणुका शहाणे, अभिनेता सुबोध भावे यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. विशेष म्हणजे सिद्धार्थ यामध्ये एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळत आहे. त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी असल्याचं पाहायला मिळतं.

दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ बोडके व अभिनेत्री तितीक्षा तावडे यांनी २६ फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली. यापूर्वी ही जोडी ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत पाहायला मिळाली होती. त्या मालिकेतील त्यांची मनवा-राजवीर ही ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यानंतर मात्र या दोघांनी कोणत्या मालिकेत एकत्र काम केलेलं नाही. त्यामुळे या जोडीला ऑनस्क्रीन पुन्हा एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.