‘आभाळमाया’चा बंटी, ‘वादळवाट’चा सोहम चौधरी असो किंवा ‘जर तरची गोष्ट’ सांगणारा सागर. त्याचा शांत स्वभाव, समजूतदारपणा अन् सहज सुंदर अभिनय प्रेक्षकांना कायमच भावला. चित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवून प्रेक्षकांना ‘आणि काय हवं?’ असेल याचा प्रामाणिक विचार करणारा गुणी अभिनेता म्हणजेच उमेश कामत. त्याला रंगभूमीवर काम करताना पाहिलं की, ‘टाइमप्लीज’ घेऊच नये असं वाटत राहतं. अशा या बहुगुणी कलाकाराचा आज ४४ वा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याचा आजवरचा प्रवास…
आरबीआय कॉलनीमधलं बालपण ते कलाक्षेत्र
मराठी कलाविश्व गाजवणाऱ्या प्रेक्षकांच्या लाडक्या उमेश कामतचा जन्म मुंबईत मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आई आरबीआयमध्ये नोकरीला असल्याने त्याचं संपूर्ण बालपण मुंबईतील सांताक्रुझच्या आरबीआय कॉलनीत गेलं. आई निवृत्त झाल्यावर उमेश कुटुंबासह कुर्ल्यातील नेहरु नगरमध्ये राहू लागला. खारमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करुन उमेशने मुंबईच्या नामांकित रुपारेल महाविद्यालयात वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली. यानंतर पोतदार महाविद्यालयातून त्याने वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी मिळवली. शैक्षणिक गाभा उत्तम असूनही आपल्या मुलाने कलाक्षेत्रात काम करावं अशी उमेशच्या आईची मनापासून इच्छा होती. आई-बाबांच्या पाठिंब्यामुळे त्याने लहान वयातच एकांकिका नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली.
खरंतर उमेश कलाक्षेत्रात अपघाताने आला याविषयी दूरदर्शन वाहिनीच्या दुसरी बाजू कार्यक्रमात उमेशने सांगितलं होतं. तो म्हणाला, “आमच्या घरात कोणीच या क्षेत्रात काम करणारं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला या क्षेत्राची मला काहीच माहिती नव्हती. एकदा वर्तमानपत्रात जाहिरात वाचून माझ्या मोठ्या भावाने सोनचाफा या नाटकासाठी ऑडिशन दिली आणि त्याने त्या नाटकाचे जवळपास २५० प्रयोग केले. माझा भाऊ त्या नाटकात काम करत असल्याने मी अनेकदा नाटकाला जाऊन बसणं, बॅकस्टेजला फिरणं या गोष्टी करायचो. तेव्हा मी पाचवीत होतो. त्यामुळे अर्थात काहीच कळत नव्हतं. नाटकाच्या कथानकानुसार माझ्या भावाची उंची वाढली आणि प्रेक्षकांच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे एक दिवस अचानक मला मोहन काकांनी (मोहन वाघ) काय रे भावाचं काम करशील का? असा प्रश्न विचारला. मोहन काकांना हो बोलायची हिंमत माझ्यात कशी आली हे मला अजूनही कळालेलं नाही. पुढे, सराव झाल्यावर मी त्या नाटकाचे ५० प्रयोग केले. त्यानंतर सुद्धा एक छंद म्हणून मी या क्षेत्राकडे पाहायचो. पण, ‘सोनचाफा’च्या निमित्ताने अपघाताने का होईना या क्षेत्रात काम करण्यास माझी सुरुवात झाली.”
‘सोनचाफा’नंतर उमेशने सुकन्या कुलकर्णी आणि आशुतोष दातार यांच्यासह ‘स्वामी’ नाटकात केलं. शाळेत असताना त्याने मालिकांमध्ये अनेक छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. पण, रुपारेल महाविद्यालयात एकांकिका स्पर्धा करताना उमेशला नाटकाचा खऱ्या अर्थाने चस्का लागला आणि आपण १० ते ५ नोकरी करू शकणार नाही यावर त्याचा ठाम विश्वास बसला. यानंतर पुढे काही वर्षात उमेशचं मराठी मनोरंजन विश्वाबरोबर एक वेगळं नातं तयार झालं.
उमेशचं मालिकाविश्व
‘आभाळमाया’च्या बंटी या भूमिकेसाठी उमेशचं नावं अभिनेत्री चैत्राली गुप्तेने सुचवलं होतं. यापूर्वी मालिकेच्या ऑडिशनचा अनुभव नसल्याने उमेशचा सेटवर पुरता गोंधळ उडाला होता. ऑडिशन देताना तो वाक्य सुद्धा विसरला होता. या वाईट ऑडिशन नंतरही दिग्दर्शक मंदार देवस्थळीने त्याला या मालिकेसाठी संधी दिली अन् उमेशचा मालिकाविश्वातील प्रवास सुरू झाला. ‘आभाळमाया’नंतर अभिनेत्याने पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘शुभं करोती’, ‘अजूनही बरसात आहे’ अशा गाजलेल्या अजरामर मालिकांमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारल्या. याशिवाय उमेशने दूरदर्शनच्या ‘पडघम’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देखील केलं होतं.
चित्रपटसृष्टीत पदार्पण
उमेशने आत्माराम धरणेंच्या ‘समर – एक संघर्ष’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. ‘वादळवाट’ मालिका करताना या चित्रपटासाठी ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी उमेशचं नाव सुचवलं होतं. या चित्रपटात त्याने एका दिव्यांग मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी उमेशचा महाराष्ट्र शासनाकडून ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. यानंतर उमेशने ‘कायद्याचं बोला’, ‘टाइमप्लीज’, ‘पुणे व्हाया बिहार’, ‘लग्न पहावे करून’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘पेईंग घोस्ट’, ‘परीस’, ‘मुंबई टाइम्स’, ‘बाळकडू’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.
रंगभूमीवरचा उमेश
उमेशच्या आजवरच्या प्रवासात रंगभूमीचा वाटा सर्वात मोठा आहे. आजच्या पिढीतील कलाकार एकीकडे वेबसीरिज, चित्रपटांकडे वळत असताना उमेश मात्र आवडीने नाटकात काम करताना दिसतो. याविषयी तो सांगतो, “सध्या तरुणाईला नाटक पाहायला खूप आवडतं. जर नाटकाचा विषय दर्जेदार असेल, तर काही लोक दोन ते तीन वेळा सुद्धा नाटक पाहतात. नाटक करताना आपण प्रेक्षकांना काय भावेल याचा सर्वाधिक विचार करतो. आपल्यावर एक वेगळी जबाबदारी असते. प्रेक्षकांची समोरासमोर मिळालेली दाद आणि त्यानंतरचं समाधान या गोष्टी खरंच खूप अद्भूत आहेत.” कॉलेजपासून एकांकिका स्पर्धा तसेच अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये काम केल्याने उमेशचा रंगभूमीवरचा वावर आणि प्रेक्षकांशी कनेक्ट होणारा दमदार अभिनय सर्वाचं लक्ष वेधून घेतो. ‘नवा गडी नवं राज्य’, ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’, ‘गांधी आडवा येतो’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’ ते सध्या गाजणारं ‘जर तरची गोष्ट’ या सगळ्या नाटकांमध्ये त्याची एक वेगळीच झलक आणि तोच उत्साह प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. मुळात त्याच्या प्रत्येक नाटकाचे विषय आजच्या तरुण पिढीला पटकन रुचतील असेच असतात. ‘नवा गडी नवं राज्य’मधून आपण अरेन्ज मॅरेज झालेल्या मध्यमवर्गीय जोडप्याची गोष्ट पाहिली, तर ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाने नव्या पिढीने प्रत्येक गोष्टीचं भान कसं राखलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं. नाटकाच्या या अनोख्या विषयांमुळेच रंगभूमीवर उमेशला भरभरून प्रेम मिळतंय.
हेही वाचा : Rajinikanth Birthday: रजनीकांत नावाचं ‘गारुड’!
वयाच्या चाळीशीतही आहे एकदम फिट
मुंबईतील बदलतं राहणीमान आणि काळाची गरज ओळखून उमेशने सायकलिंग, चालणं, जॉगिंग एकंदर त्याच्या आयुष्यात फिटनेसला सर्वाधिक महत्त्व दिलं. म्हणूनच आज वयाच्या चाळीशीतही उमेशने त्याची ‘चॉकलेट हिरो’ची इमेज कायम जपून ठेवलेली आहे. मेडिटेशन, व्यायाम, योग्य आहार, ८ तास झोप, साधारण ५ किलोमीटर चालणं, योग्यवेळी जेवण याला प्रिया-उमेश नेहमीच प्राधान्य देत असतात.
उमेश-प्रियाची पहिली भेट ते लग्न
उमेश-प्रिया म्हणजे मराठी कलाविश्वातील सर्वांचीच आवडती जोडी! या दोघांची पहिली भेट ‘आभाळमाया’ मालिकेच्या सेटवर झाली होती. यावेळी दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले होते. उमेशच्या स्वभावात लाजाळूपणा असल्याने प्रेमात प्रियाने पुढाकार घेतल्याचं दोघांनीही अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रिया-उमेशने २०११ मध्ये लग्न केलं. “आधी गर्लफ्रेंड, पुढे लग्न ते आतापर्यंत मी प्रियाच्या प्रचंड खोड्या काढतो. मला तिच्या खोड्या काढता याव्यात म्हणून मी तिच्याशी लग्न केलं असं म्हणायला हरकत नाही. अगदी खरं सांगायचं झालं तर, तिच्यासारखी बायको मिळाली तर आणि काय हवं?” असं उमेशने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं. सध्या दोघांचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर चांगलंच गाजतंय. मराठी कलाक्षेत्र गाजवणाऱ्या अशा या गुणी कलावंताला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!